आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांत महिलांचा सहभाग वाढावा- रंजना ब्रह्मा यांची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- उद्योग,व्यवसायात महिला आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु जगातील पाच कोटी चौदा लाख व्यवसायांपैकी महिलांची टक्केवारी चौदा टक्के म्हणजे खूपच कमी आहे. हे प्रमाण वाढायला हवे, असे रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्ष रंजना ब्रह्मा म्हणाल्या. 
 
जागतिक महिला दिनानिमित्त भाजप औद्योगिक आघाडीच्या वतीने एमआयडीसीमधील यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान ब्रह्मा यांच्या हस्ते करण्यात आला. जगातील यशस्वी महिला उद्योजकांविषयी त्यांनी माहिती दिली. तीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा उद्योगजगतात पाऊल ठेवले, तेव्हाची परिस्थिती खूप बिकट होती. कर्ज सहजासहजी मिळत नव्हते, मनुष्यबळाची कमतरता होती.
 
आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी दूरध्वनी करायला पोस्ट ऑफिसमध्ये रांग लावावी लागे. अलीकडे अद्ययावत सुविधा मोबाइलमुळे तत्काळ व्यवहार होतात. त्यामुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढायला हवा, असे ब्रह्मा म्हणाल्या. 
 
उद्योजिका अनघा बंदिष्टी, मधुरा झावरे, माधुरी मोहोळे, दीपा चंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी औद्योगिक आघाडीचे अध्यक्ष विश्वनाथ पोंदे, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष संगीता खरमाळे, विकास आघाडीचे उपाध्यक्ष अजित चाबुकस्वार, उद्योजक प्रदीप ब्रह्मा, दिलीप अकोलकर, संजय बंदिष्टी, सविता चाबुकस्वार उपस्थित होत्या. 
 
महिलांचे सक्षमीकरण : गांधी 
महिलांचे सक्षमीकरण शिक्षण हा ग्रामीण विकासाचा मूलभूत पाया आहे. महिला सक्षम झाल्यास विकासात्मक परिवर्तन होणार आहे. महिला, युवक युवतींसाठी सरकारच्या विविध योजना आहेत, असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. नेहरु युवा केंद्र संचलित ग्रामीण विकास संशोधन केंद्र, रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर स्वामिनी महिला बचत संघाच्या वतीने पारनेर येथे आयोजित महिला मेळाव्यात खासदार गांधी बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जि. प. सदस्य सुप्रिया झावरे, राणी लंके, पं. स. सदस्य सुनंदा धुरपते, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, संस्थेच्या अध्यक्ष सविता महांडुळे, श्वेता वाघ, सुनील मुठे, अश्विनी बले, जयश्री भालेराव, मनीषा शेंडकर, अनिता ढुमणे, निर्मला भालेकर, सोनाली औटी आदी उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत सविता महांडुळे यांनी केले. 
 
प्रास्ताविकात गोडसे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित महिला सरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अपंग आंतरधर्मिय नवविवाहित जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान मतदार जागृती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 
 
स्त्री शक्तीचा सन्मान करा 
सामाजिक समस्या कमी करण्यासाठी स्त्री संस्कार हे महत्त्वाचे साधन अाहे. भ्रष्टाचार, मुलींवरील अत्याचार विषमता कमी करण्यासाठी प्रत्येकानेच स्त्री शक्तीचा सन्मान करणे अत्यावश्यक आहे. सृजनचे सामर्थ्य निसर्गाने फक्त स्त्रीला दिले असल्याने समाजाच्या भल्यासाठी तिचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी राज योगिनी दिव्यप्रभा यांनी केले. 
 
इनरव्हील क्लब आणि शेवगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वाहतूक आणि पर्यटन विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक दिव्यप्रभा, अॅड. निर्मला चौधरी, शेवगावच्या केंद्र संचालिका पुष्पा बहेनजी, इनरव्हीलच्या अध्यक्ष डॉ. मनीषा लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 
प्रास्ताविकात डॉ. लड्डा यांनी मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्याबरोबरच भावनिक आरोग्याचे महत्त्व सांगितले.
 
चौधरी यांनी सद्य सामाजिक परिस्थितीत महिला मुलींसमोर उभ्या असलेल्या समस्या, हिंसाचार, अत्याचार त्यावरील कायदेशीर उपायांची माहिती देत सोशल मीडियाचा होत असलेला अतिरेकी वापर प्रत्येक गोष्टीत मुलींनाच दोष देण्याचा समाजाचा दृष्टिकोन यावर भाष्य केले. सूत्रसंचालन श्रीकांता शिंदे यांनी केले. आभार राठी यांनी मानले. 
 
आरोग्याकडे दुर्लक्ष नको : जोशी 
धकाधकीच्या जीवनात महिला कुटुंबाकडे लक्ष देते, परंतु स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे विविध आजारांना तिला सामोरे जावे लागते. रक्तातील साखर हिमोग्लोबीनच्या प्रमाणाची तपासणी करून त्याप्रमाणे आहार घेतला, तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. उपचार वेळीच केल्यास त्याचा फायदा होतो, असे डॉलविन असोसिएशनच्या अध्यक्ष पल्लवी जोशी यांनी सांगितले. 
 
डॉलविन असोसिएशन, प्रगती माहेर महिला बचतगटाच्या वतीने महिलांकरिता रक्तातील हिमोग्लोबिन, साखरेची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी शर्ली थोलार, डॉ. गीता करंदीकर, डॉ. रेणुका पाठक, डाॅ. सोनाली वहाडणे, प्रिया जानवे, भारती भागवत, स्वाती पाठक, मनीषा मुळे आदी उपस्थित होते. हा उपक्रम गुलमोहोर रस्त्यावरील जोशी हाॅस्पिटलमध्ये झाला. पाठक यांनी व्यायामाचे महत्त्व सांगत शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कसे वाढेल, याची माहिती दिली. वहाडणे यांनी स्वत:ची तपासणी कशी करायची हे सांगितले. गीता करंदीकर यांनीही आरोग्याबाबत माहिती दिली. शर्ली थोलार यांनी बचत गटातील महिला प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत आपला वेगळा ठसा उमटवत असल्याचे सांगितले. 
 
स्वत:चे संरक्षण करायला शिका 
महिलांनी स्वत:चे संरक्षण करायला शिकले पाहिजे, असे नगरसेविका रुपाली वारे यांनी सांगितले. कचरावेचक रुग्णसेवक महिलांना श्रीसाई संघर्ष प्रतिष्ठान अस्तित्व फाउंडेशनतर्फे रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी मानवाधिकार संघटनेच्या संध्या मेढे होत्या. वयाची शंभरी ओलांडलेल्या निवृत्त सफाई महिला कामगार चाची कुडिया, तसेच विठाबाई साबळे, सुनिता गायकवाड, बचत गटाच्या मोहिनी लोळगे, अंजली शहाणे, डॉ. विद्या त्र्यंबके आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...