आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी संप: खासगी वाहतुकीची ‘दिवाळी’; प्रवाशांचा मात्र शिमगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फायदा अवैध वाहतूकदारांनी प्रवाशांकडून पाचपट दर उकळले. एसटीच्या संपामुळे अवैध वाहतूकदारांची दिवाळी, तर प्रवाशांना शिमगा घालण्याची वेळ आली. जिल्हाभरातील सर्वच बसस्थानकांत शुकशुकाट होता.
 
सकाळी तारकपूर आगार येथे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) इतर मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या वतीने कामबंद ठेवून द्वारसभा घेण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिनकर लिपाणे, सचिव सुरेश चौधरी, बी. आर. काळे, दिलीप मेहेर, कामगार संघटनेचे अरुण दळवी, शिवाजी कडूस, एस. जी. खाडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, प्रकाश भागानगरे, साहेब जहागीरदार, हनिफ शेख आदी उपस्थित होते. 

लिपाणे म्हणाले, महामंडळातील कर्मचाऱ्यांना अद्यापि सहावा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. यामुळे वेतनात मोठी तफावत निर्माण होऊन, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक परिवहन विभागांतील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या अाहेत. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी कराराचा कालावधी ३१ मार्च २०१६ रोजी संपला आहे. इतर मंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी वेतन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मिळत आहे. इतर राज्यातील परिवहन महामंडळांनी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करून, सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय लागू करून, इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 
 
मध्यरात्रीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर एकही एसटीची बस रस्त्यावर धावताना दिसली नाही. सर्व बसस्थानकात शुकशुकाट होता. ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. याचा फायदा खासगी बेकायदेशीर प्रवासी वाहतूकदारांनी घेतला. प्रवासी बसस्थानकाबाहेर थांबून मिळेल त्या वाहनाला हात दाखवून प्रवास करत होते. एसटी प्रवास भाड्याच्या तुलनेत दोन ते तीन पटीने जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लुट सुरू होती. या संपामुळे सणासुदीला गावाकडे येणारे प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.  
बातम्या आणखी आहेत...