आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patel Gujarat Chief Minister Anandibena Rally At Sangamner,latest News In Divya Marathi

परिवर्तन घडवण्यासाठी महिलांनीच पुढे यावे, मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- गेल्या तेरा वर्षांत गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमूलाग्र बदल झाला. त्यामुळे देशाने त्यांच्या हाती बहुमताने सत्ता दिली. सरकार जर गुजरातमध्ये एवढे बदल करू शकते, तर महाराष्ट्रातही भाजप सरकारच्या माध्यमातून ते सहज साध्य होऊ शकते. त्यासाठी राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार आणा. शेवटच्या माणसापर्यंत गेल्यानंतर त्यांच्या समस्या माहिती होऊन त्यांची उकल करता येते. राज्यात महिलांच्या समस्या गंभीर असल्याने महिलांनीच आता परिवर्तन घडवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले.
भाजपचे उमेदवार राजेश चौधरी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पटेल रविवारी संगमनेरमध्ये आल्या होत्या. येथील शारदा हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या त्यांच्या सभेसाठी संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा निरीक्षक के. सी. पटेल, गुजरातचे हरी गोविंदभाई जोशी, उमेदवार राजेश चौधरी, राधावल्लभ कासट, विठ्ठल शिंदे, भरत फटांगरे, शिरीष मुळे, कांचन ढोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पटेल म्हणाल्या, येथील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. संगमनेर तालुक्यात वारंवार दुष्काळ पडतो. धरणे आहेत, पण कालवे नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना ही समस्या सोडवता आलेली नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार जर पाणी, वीज, आरोग्य अशा क्षेत्रात काम करू शकत नसेल, तर हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. भाजपला पाच वर्षे बहुमतात काम करण्याची संधी द्या. सरकारचे काम तुम्हाला पटले नाही, तर पुन्हा सत्ता देऊ नका. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईपासून गुजरात वेगळे झाले. मुंबईला आम्ही मोठा भाऊ समजतो. मात्र, गेल्या चाळीस वर्षांतील गुजरात आणि महाराष्ट्र यात किती तफावत आहे याचे आत्मपरीक्षण करा. गुजरातचे मंत्री कार्यालयात बसून काम करत नाहीत, तर लोकांत जाऊन समस्या सोडवण्यास प्राधान्य देतात, असे त्या म्हणाल्या. निवडणुकीत पाच पक्ष उभे असल्याने मतविभागणी अटळ असल्याचे स्पष्ट करत कोणता पक्ष काम करू शकेल याचा विचार करा.
यूपीएचे सरकार भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याने देशाने आज मोदींवर विश्वास ठेवला. अन्य पक्षांच्या मदतीवर चालणारे सरकार व्यवस्थित काम करू शकत नसल्याने राज्यातही भाजपला बहुमत द्या, असे आनंदीबाई म्हणाल्या. अ‍ॅड. बाळासाहेब पोखरकर, हरी गोविंदभाई जोशी, विठ्ठल शिंदे यांची या वेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन श्रीराम गणपुले यांनी केले.