आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांच्या कामात पुन्हा गैरव्यवहार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-शहरातील पथदिव्यांच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. औरंगाबाद व कल्याण या दोन महामार्गांवर पथदिवे नसतानाही संबंधित ठेकेदार कंपनीला या कामाचे पैसे देण्यात आले आहेत. त्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी मुस्लिम विकास परिषदेने आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे सोमवारी केली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी वर्षभरापूर्वीच पथदिव्यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल अजून गुलदस्त्यात असतानाच दुसरा गैरव्यवहार समोर आला आहे.

महापालिकेने राष्ट्रीय सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुमारे 10 कोटींचे विद्युतीकरणाची कामे हाती घेतली आहेत. अमित इंजिनिअर्स (औरंगाबाद), यश इलेक्ट्रोलाइन (पिंपरी-चिंचवड), उरमुडे इलेक्ट्रोमेक इंडस्ट्रीज (अहमदनगर) व एस. एस. इलेक्ट्रीक (डोंबीवली) या चार कंपन्यांना ही कामे विभागून देण्यात आली आहेत. त्यापैकी एस. एस. इलेक्ट्रीकला औरंगाबाद, कल्याण, मनमाड व पुणे अशा चार महामार्गांवर 1 कोटी 51 लाख रुपये खर्चाचे पथदिवे बसवण्याचे काम देण्यात आले होते. त्यापैकी मनमाड महामार्गावरील नागापूर पेट्रोलपंप ते पत्रकार चौक व पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक ते शहर वाहतूक कार्यालयापर्यंत पथदिवे बसवण्यात आले. परंतु डीएसपी चौक ते सनी हॉटेल व नेप्ती चौक ते कल्याण महामार्गावर पथदिवे बसवण्याचे काम अजून सुरू झालेले नाही. संबंधित कंपनीने चारही कामांसाठी 3 लाख 77 हजार 500 रुपयांची अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. परंतु महापालिकेने आतापर्यंत झालेल्या कामापेक्षा अधिक रक्कम (1 कोटी 15 लाख) संबंधित कंपनीला दिली. त्यामुळे उर्वरित काम न करण्याचा पवित्रा आता या ठेकेदार कंपनीने घेतला आहे.

पथदिव्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने संपूर्ण कामांच्या चौकशीसाठी पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची नेमणूक केली. महाविद्यालयामार्फत कामाचे तांत्रिक लेखा परीक्षण करण्यात आले, परंतु त्याचा अहवाल अजून गुलदस्त्यात आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीवर कृपादृष्टी दाखवत झालेल्या कामापेक्षा अधिक रक्कम अदा केली. त्यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम विकास परिषदेने आयुक्त कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.