आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील यांनी झटकली बांधकामची जबाबदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेचा बांधकाम विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. बांधकामचा अतिरिक्त पदभार सांभाळण्यास नगररचनाकार राजेंद्र पाटील यांनी नकार दिला आहे. शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्याने मागील काही दिवसांपासून पाटील यांच्याकडे बांधकामची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी झटकल्याने नवा प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

मनपाच्या अनेक विभागांमध्ये वर्षानुवर्षे प्रभारी राज सुरू आहे. त्यात बांधकामचा क्रमांक सर्वात वर आहे. शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा विभाग नेहमीच चर्चेत असतो. महत्त्वाच्या फाईली चोरीला जाण्याचे प्रकारही या विभागात घडले आहेत. काही दिवस प्रभारी शहर अभियंता पदावर असलेले अधिकारी आर. जी. सातपुते यांनी, तर लाखो रुपयांचा गैरव्यवहार करून तो पचवलाही. तत्कालीन शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांच्यानंतर शहर अभियंतापदी पुन्हा नंदकुमार मगर यांची वर्णी लागली. मगर यांनी बांधकामची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, परंतु त्यांनाही रिलायन्ससारख्या गैरव्यवहारांना सामोरे जावे लागले. कामांसाठी पदाधिकारी नगरसेवकांचा दबाब, ठेकेदारांची उठबस, टक्केवारीचा घोळ अशा अनेक कारणांमुळे हा विभाग बदनाम झाला आहे.

विद्यमान शहर अभियंता मगर चौथ्यांदा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले. त्यामुळे या विभागाची जबाबदारी नगररचनाकार पाटील यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी काही महिने जबाबदारी सांभाळली देखील. परंतु आता त्यांनी नकार दिला आहे. तसा अर्ज त्यांनी आयुक्त विलास ढगे यांना दिला आहे.

या विभागात काम करण्यासाठी सातपुते यांच्यासारखे अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी दिल्यास आयुक्त ढगे यांना अनेकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल. पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच आयुक्तांकडे अर्ज दिला आहे. त्यांनी या चार दिवसांत एकाही फाईलवर सहीदेखील केलेली नाही. त्यामुळे हा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बैठकीत झाले गुफ्तगू
पाटीलयांनी बांधकामची जबाबदारी सांभाळण्यास नकार दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दुपारी आयुक्त, उपायुक्त, महापौर अभिषेक कळमकर, माजी आमदार दादा कळमकर पाटील यांच्या गुफ्तगू झाले. मात्र, पाटील यांच्या अर्जाबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाही.

मूलभूत सुविधांच्या यादीचा घोळ
मूलभूतसुविधांच्या ४० कोटी रुपयांच्या कामाचा वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. विभागीय आयुक्तांनी प्रस्तावातील कामांचा अहवाल मागवला आहे. प्रस्तावातील कामांची यादी बदलण्यासाठी पाटील यांच्यावर काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढला. त्यामुळेच पाटील यांनी तडकाफडकी बांधकाम विभागाची जबाबदारी झटकली असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.