नगर- गुंतवणुकदाराचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला वारस म्हणून मिळणारी विम्याची रक्कम नाकारणाऱ्या पर्ल्स कंपनीला ग्राहक मंचाने चपराक दिली आहे. तक्रारदार महिलेला विम्याची रक्कम व नुकसान भरपाईपोटी 27 हजार 500 रुपये द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष प्रभाकर देशपांडे, सदस्या चारूशीला भुरे व विष्णू गायकवाड यांनी बुधवारी हे आदेश दिले.
राहाता तालुक्यातील गुतवणुकदार जनार्दन गोरे यांनी पर्ल्स कंपनीत पंधरा हजारांची गुंतवणूक केली होती. त्यापोटी अडीच हजारांचा पहिला हप्ताही जमा केला होता. दोन हफ्ते जमा केल्यानंतर 18 जुलै 2010 ला त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे वारस या नात्याने त्यांच्या पत्नी लता गोरे यांनी पर्ल्स कंपनीकडे विम्याला लाभ मिळावा म्हणून अर्ज केला. पण, कंपनीने दखल घेतली नाही. त्यामुळे श्रीमती गोरे यांनी अॅड. सुनील मुंदडा यांच्यामार्फत ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाची नोटीस आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी ग्राहक मंचात हजर झाले. त्यांनी कंपनी विमा व्यवसाय करत नसल्यामुळे तक्रार नाकारण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व कागदपत्रे पाहून गोरे या वारस म्हणून विम्याची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचा निष्कर्ष ग्राहक मंचाने काढला. पर्ल्सने "आयआरडीए' अंतर्गत कॉर्पोरेट एजंट म्हणून नोंदणीप्राप्त कंपनी आहे. त्यामुळे कंपनीने गोरे यांना विम्याची रक्कम व नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मंचाने दिले.