आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐतिहासिक वारसा: पेडगावच्या बहादूरगडाचा पर्यटन विकास करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदे) येथील बहादूरगडाचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी श्री गोंदे येथील कल्चरल हेरिटेज प्रिझव्र्हेशन ट्रस्टच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून संबंधितांना पाठवण्यात आला.

पेडगावच्या या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. सन 1689 मध्ये कपटकारस्थान करून संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना भीमेकाठच्या पेडगावला आणण्यात आले. पेडगाव येथे तेव्हा मोगलांची मोठी छावणी होती. 52 पेठांचे गाव म्हणून पेडगाव प्रसिद्ध होते. मोगल बादशाह औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भेट याच किल्ल्यात झाली. संभाजीराजांनी शरण यावे, म्हणून त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. तापवलेल्या गजाने डोळे काढण्याची, तसेच जीभ छाटण्याची क्रूर शिक्षा या स्वाभिमानी राजाने सहन केली, पण स्वाभिमान सोडला नाही. नंतर त्यांना वढूला नेण्यात आले. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य अबाधित राखण्यासाठी संभाजीराजांनी बलिदान दिले. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सामान्य जनतेने शत्रूशी लढा सुरूच ठेवला.

संभाजीराजांच्या स्मृती जागवण्यासाठी या किल्ल्याला ‘धर्मवीरगड’ असे संबोधले जाते. दरवर्षी संभाजीराजांच्या बलिदानदिनी फाल्गून वद्य अमावास्येला महाराष्ट्राच्या विविध भागांतील युवक या किल्ल्यात जमतात. वीरस्तंभाच्या साक्षीने शक्तिज्योत पेटवून ती वढू, तुळापूरला घेऊन जातात.

या किल्ल्याची बरीचशी पडझड झाली असली, तरी तटबंदीचा काही भाग, बुरूज, वेशी, मंदिरे, तसेच महालांचे अवशेष अजून तेथे आहेत. या किल्ल्याचा पर्यटनविकास करून आवश्यक त्या सुविधा तेथे उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी श्री गोंदे येथील इतिहासाचे अभ्यासक व श्री गोंद्याच्या कल्चरल हेरिटेज प्रिझव्र्हेशन ट्रस्टचे सचिव प्रा. नारायण गवळी यांनी केली आहे.

पर्यटन आराखड्यातील प्रमुख मुद्दे -
पहिल्या टप्प्यात किल्ल्यातील काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ करणे, आवश्यक तेथे रस्ते तयार करून पथदिवे उभारणे, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय करणे, उद्यान तयार करणे, संभाजीराजांची स्मृती जपणार्‍या जागेचा विकास करणे.

दुसर्‍या टप्प्यात पुरातत्व विभागाच्या वतीने किल्ल्याची दुरुस्ती करणे, प्रवेशद्वार, मंदिरे, राणी महाल, मशीद, पीर, हत्तीमोट, मनोरा, पाणदरवाजा, टेहळणी बुरूज यांचे जतन करणे, माहिती फलक लावणे; तिसर्‍या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारून परिसर सुशोभित करणे, चौथ्या टप्प्यात संग्रहालय, सांस्कृतिक केंद्र, ग्रंथालय, आखाडा, उपाहारगृह, तर पाचव्या टप्प्यात घाट, नौकानयन, गोशाळा, वाहनतळाचा विकास अशी कामे प्रस्तावित असतील. नंतरच्या काळात छत्रपती संभाजीराजे आय केअर सेंटर, भक्तनिवास व पेडगाव-तुळापूर संभाजी ज्योत मार्गाचा विकास याकडे लक्ष द्यावे, असे ट्रस्टचे म्हणणे आहे.

नौकानयन आकर्षण
पेडगावचा किल्ला श्रीगोंद्यापासून 12 किलोमीटर, तर अष्टविनायकातील सिद्धटेकपासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथील रेणुकामातेचे प्रसिद्ध मंदिरही केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते नीट केले, तर ही तिन्ही ठिकाणे पर्यटकांना एका दिवसात सहज पाहता येतील. पेडगाव येथे नौकानयनाची सुविधा करता येईल.