आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस विनापरवाना शालेय वाहनांना दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. पण, अशी जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना नाहक जीवघेणा प्रवास सुरूच होता. याकडे "दिव्य मराठी'ने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने चार दिवसांपासून विनापरवाना शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत २० वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत होत कारवाईत वाहनाचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा वाहन परवाना बॅच यांची तपासणी होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई सुरू झाली आहे. २३ जूनला कारवाईला मुहूर्त लाभला. आतापावेतो २० वाहनांवर कारवाई करून १९ हजार ४०० रुपयांचा दंड १० हजार ७५० रुपयांचा कर वसूल करण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक बी. पी. रुपदास, सहायक मोटार वाहन निरीक्षक पी. बी. काटकर यांनी ही कारवाई केली.

"दिव्य मराठी'त वृत्त प्रसिद्ध होताच २५ जूनला सैनिक कल्याण सभागृहात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गिते, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी बैठक घेतली. यामध्ये स्कूलबस नियमावलीची माहिती देण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या नियमावलीनुसार सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेत शालेय स्कूलबस समितीच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या.

शालेय विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक करणा-या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली. ही वाहने तारकपूर आगारात लावण्यात आली आहेत.२० जून रोजी दैनिक दिव्य मराठीने विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

पालकांनीही घ्यावी काळजी
पालकांनीआपल्या पाल्यांना परवाना असलेल्या वाहनातून शाळेत पाठवावे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणा-या वाहनांमध्ये पाल्यांना पाठवू नये. अशा वाहनांवर कारवाई झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. त्यामुळे पालकांनीच काळजी घ्यावी.'' राजारामगिते, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...