आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण क्रौर्याची जखम अजूनही भळभळती, राज्यभरातून आलेल्यांनी वाहिली कोपर्डीत श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपर्डीतील दुर्दैवी निर्भयाला गुरूवारी श्रद्धांजली वाहताना जनसमुदाय. - Divya Marathi
कोपर्डीतील दुर्दैवी निर्भयाला गुरूवारी श्रद्धांजली वाहताना जनसमुदाय.
कर्जत- कर्जत तालुक्यासह राज्य हादरवून सोडणाऱ्या मराठा समाजाला संघटित करणाऱ्या कोपर्डीतील निर्घृण अत्याचार हत्या प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष झाले. त्यानिमित्त राज्यभरातून लोकांनी येथे येऊन पीडितेला श्रद्धांजली वाहिली. एक वर्ष पूर्ण झाले, तरी क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेची जखम अजून भळभळती असल्याचे जमलेल्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत होते.
 
कोपर्डीच्या या निर्भयाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांसह राज्यभरातून अनेक संघटनाचे पदाधिकारी येथे आले होते. सकाळी नऊ वाजता निर्भयाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत वासुदेव आर्वीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन झाले. यानंतर सर्वांनी पीडित मुलीच्या समाधीवर फुले अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पीडितेचे आई, वडील, भाऊ यांनी मुलीच्या समाधीवर पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हा परिषद सदस्य उमेश परहर, राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंके,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शिवानंद भानुसे, छावा संघटनेचे युवा कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, आबा पाटील आदी उपस्थित होते.
 
स्मारकास ब्रिगेडचा विरोध
सूर्योदयपरिवारातर्फे कोपर्डी येथील निर्भयाच्या घरासमोर सुरू असलेल्या स्मारकावर मूर्ती बसवण्यात येणार होती. भय्यूजी महाराज यांचे प्रबोधनही होणार होते. मात्र, बुधवारी संभाजी ब्रिगेडने या स्मारकास विरोध केल्याने गुरुवारी भय्युजी महाराज यांनी येण्याचे टाळले. या पार्श्वभूमीवर कोपर्डी आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याने या भागात पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
 
स्मारक नव्हे समाधीस्थळ
हाआमचा घरगुती प्रश्न आहे. कोण काय म्हणते, हे पाहण्यापेक्षा आमच्या मुलीची आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी ही समाधी उभारली आहे. त्यासाठी कोणतीही शासकीय मदत आम्ही मागितली नाही. हे स्मृतिस्थळ (समाधी) आहे. हे तिचे स्मारक नाही. त्यामुळे या समाधीस्थळास कोणीही विरोध करू नये, आहे, अशी प्रतिक्रिया ‘निर्भया’च्या वडिलांनी व्यक्त केली.
 
रूदनात निसर्गाचाही सूर
एकवर्षापूर्वी घडलेल्या अमानुष घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त कोपर्डी येथे श्रद्धांजली वाहिली जात असताना सर्वांचे कंठ दाटून आले होते. यावेळी झालेल्या मराठा क्रांती आढावा मेळाव्याच्या समारोपप्रसंगी निसर्गालाही आपले अश्रू थांबवता आले नाहीत. गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या वरूण राजाने अचानक हजेरी लावली. या भागात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
 
भय्युजीमहाराजांच्या पुतळ्याचे कर्जतमध्ये दहन
कर्जतयेथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडतर्फे घोषणा करत भय्युजी महाराज यांच्या पुतळ्याचे सकाळी दहन करण्यात आले. यानंतर संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे त्यांचे कार्यकर्ते कोपर्डीकडे जाण्यास निघाले असता उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी परकाळेंसह टिळक भोस, गणेश गायकवाड, दत्ता भोसले, दीपक तनपुरे, अरविंद कापसे, युवराज चिकलठाणे यांना अटक करून ताब्यात घेतले. नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले.
 
शाळा सुरू करा, स्मारक होऊ देणार नाही
स्मारकास संभाजीब्रिगेडचा विरोध अाहे. आपण स्वत: तुळशीची माळ, कपाळी बुक्का, टोपी घालून खिशात शाईची बाटली घेऊन आलो होतो. भय्यूजी महाराज आले असते, तर त्यांचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने जवळ जाऊन आम्ही त्यांच्यावर शाई फेकणार होतो. भय्यूजी महाराज यांनी पीडितेच्या नावाने याठिकाणी शाळा, कॉलेज अथवा वसतिगृह सुरु करावे. पीडितेचे स्मारक होऊ देणार नाही.''
- अण्णासाहेब सावंत विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
 
कडक कायदे अंमलात आणणे गरजेचे
गुन्हेगारीप्रवृत्तीला वेळीच आळा बसला नाही, तर ती किती बेफाम होते याची प्रचिती कोपर्डीप्रकरणात आली. या गुन्हेगारांना वेळीच शासन व्हायला पाहिजे, मात्र त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याने अशा प्रवृत्तीला कायद्याची जरब राहिली नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनेत कडक कायदे अंमलात आणणे गरजेचे बनले आहे.’’
- मंजूषा गुंड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.
 
वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नकाे
पीडितेचे कुटुंब दु:खातून सावरत आहे. तिला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. मुलीच्या नावाने शाळा,महाविद्यालय यासारखे उपक्रम सुरु करावेत. आमचा स्मारकाला विरोध आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत विचारले असता घरच्यांनी तिची समाधी उभारली असल्याचे सांगितले. अशा गोष्टीवरून कोणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हा श्रेय घेण्याचा विषय नाही.''
- नानासाहेब जावळे, प्रदेश कार्याध्यक्ष, छावा संघटना.
 
 
बातम्या आणखी आहेत...