आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेनवॉटर हार्वेस्टिंग'साठी नागरिकांचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महावीर अपार्टमेंटमधील नागरिकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू केले. छाया: उदय जोशी - Divya Marathi
महावीर अपार्टमेंटमधील नागरिकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू केले. छाया: उदय जोशी
नगर - 'दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग अभियानास नगरकरांकडून माेठा प्रतिसाद मिळत आहे. खिस्तगल्लीतील महावीर अपार्टमेंटमधील नागरिकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू केले. पाइपलाइन रस्त्यावरील वाणीनगर येथील एका नागरिकानेही आपल्या घराच्या छतावर हा उपक्रम राबवला. नगर शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना रुजत असल्याने भविष्यात पाणीप्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.
पाऊस हाच पाण्याचा मूलभूत स्त्रोत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. वेळेत पाऊस पडला नाही, तर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी दिव्य मराठीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अभियान हाती घेतले आहे. पर्यावरणप्रेमी हरियाली संस्थाही त्यासाठी प्रयत्न करत आहे. नगरकरांनीही या संकल्पनेस पसंत दिली आहे.
खिस्तगल्लीतील महावीर अपार्टमेंटमधील नऊ रहिवाशांनी एकत्र येऊन अपार्टमेंटच्या दोनशे चौरस मीटर छतावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. अवघ्या दहा ते बारा हजार रुपयांमध्ये हा उपक्रम करण्यात आला. अपार्टमेंटच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते पुन्हा भूगर्भात साेडण्यात येते. महावीर अपार्टमेंटमधील नागरिकांप्रमाणे इतरांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा आग्रह धरला, तर शहराचा पाणीप्रश्न निश्चितच सुटेल.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १४० 'ब' नुसार शहरातील इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. त्यासाठी नागरिकांना विविध करांतून काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. सूट किती कोणत्या प्रमाणात द्यायची, याबाबतचा निर्णय संबंधित महापालिकांनी घ्यायचा आहे. त्यानुसार नगर महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा बायोगॅस यापैकी दोन उपक्रम राबवणाऱ्या नागरिकांना संकलित करात टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स, तसेच विविध कार्यालयांच्या इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. शहरात अशा ८० पेक्षा अधिक इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.

फायदेशीर उपक्रम
स्वत:च्या घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दैनिक दिव्य मराठी हरियाली संस्थेची मोठी मदत झाली. रेनवॉटर हार्वेस्टिंग हा फायदेशीर पर्यावरणाचे संतूलन राखणारा उपक्रम आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी स्वत:च्या घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यास भविष्यातील पाणीप्रश्न सुटेल.'' रमेश घुले, नागरिक.
सर्वांनी एकत्र यावे
"दिव्य मराठी'तील रेनवाॅटर हार्वेस्टिंगची बातमी वाचली. हरियालीचे अध्यक्ष खामकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू केले. अपार्टमेंटमधील सर्व नागरिक एकत्र आलो. इतरांनीदेखील एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे.'' मनोज शहा, अध्यक्ष,महावीर अपार्टमेंट.

हा आहे फायदा
नगरशहरात पावसाचे सरासरी प्रमाण ७०० मिलिमीटर आहे. संपूर्ण पावसाळ्यात एक हजार चौरस मीटरच्या इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे अडवले, तर १० हजार लिटरचे ५६ टँकर पाणी उपलब्ध होते. हे पाणी बोअरवेलमध्ये सोडले, तर भूजलपातळी वाढण्यास मदत होते. हा उपक्रम राबण्यासाठी एका इमारतीसाठी जास्तीत जास्त १० ते १५ हजार रुपये खर्च येत असला, तरी तो मनपाकडून मिळणाऱ्या कर सवलतीमधून वसूल होतो.

पाणीटंचाईवर उत्तम पर्याय
दिवसेंदिवसपावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे अडवले, तर भविष्यात निर्माण हाेणारा पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. जास्तीत जास्त नगकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे. तांत्रिक माहितीसाठी ८१४९९७८७६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी केले आहे.
अाम्ही पर्याय स्वीकारला
पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी आपण आतापासूनच सावध झाले पाहिजे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग हा उत्तम पर्याय आहे. आम्ही हा पर्याय स्वीकारला.'' सूर्यकांतसैंदाणे, सदस्य,महावीर अपार्टमेंट.