आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Adopted To Child News In Marathi, Divya Marathi

अनाथ भावंडांना मिळाला ‘आधार’, चार वर्षांपूर्वी अपघातात आई-वडिलांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चार वर्षांपूर्वी ऊसतोडणी कामगार दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या तीन चिमुरड्या मुली आणि एक मुलगा अनाथ झाला. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आजीने स्वीकारली, पण शैक्षणिक खर्च पेलवत नसल्याने या चिमुरड्यांना शाळेतून काढले. ही बाब लक्षात आल्यानंतर संगमनेर येथील ‘आधार’ संस्थेने या निराधार चिमुरड्यांना आर्थिक आधार दिला.

प्रकाश साबळे व मनीषा साबळे हे ऊसतोडणी कामगार होते. त्यांचा चार वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे प्रीती, स्वाती, साक्षी या तीन मुलींसह मुलगा प्रथमेश अनाथ झाले. या मुलांना पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी) येथील आजी तारामती वाघमारे यांनी आपल्याकडे आणले. तेथे त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. आजी मोलमजुरी करत असल्याने या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवत नव्हता, तसेच उपजीविका करणेही कठीण झाले. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मोठी दहा वर्षांची मुलगी प्रीती हिच्यावर पडली. तिच्यासह दोन्ही बहिणींचे शिक्षण बंद झाले. या तिघी बहिणी एक वर्षाचा भाऊ प्रथमेशला सांभाळत आहेत.

शाळेतील संबंधित शिक्षकांनी आजी तारामती यांची भेट घेऊन मुलींना शाळेत पाठवण्यास सांगितले. या मुलांच्या शिक्षणासाठी या शिक्षकांनी वर्गणी करण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासून या तीनही मुलींचे शिक्षण सुरू झाले, तसेच विद्यार्थ्यांनी शाळेतच प्रथमेशचा सांभाळ सुरू झाला. पण दिवसेंदिवस वाढता शिक्षणाचा खर्च पेलवण्यासाठी या मुलांना कायमस्वरूपी मदतीची गरज होती. त्यावेळी वर्गशिक्षक जयराम सातपुते यांनी संगमनेरच्या आधार या खासगी संस्थेशी संपर्क करून मुलांना मदत करण्याची विनंती केली. संपूर्ण परिस्थिती लक्षात आल्यानंतर संस्थेचे सभासद सुखदेव इल्हे यांनी संस्थेमार्फत दरवर्षी तीन हजार रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. तीन वर्षांपासून संस्थेकडून मुलांना आधार मिळत आहे. संस्थेने पाठवलेल्या रकमेचा धनादेश नुकताच गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्याकडे सातपुते यांनी सुपूर्द केला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल भवार आदी उपस्थित होते. समाजातच पोरक्या झालेल्या मुलांना आता समाजाकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे.

आता समाजाचा आधार
आई-वडिलांच्या अपघाती निधनानंतर या अनाथ चार मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न आहे. वर्गशिक्षक, तसेच आधार संस्थेने मदतीचा हात दिला. पण खडतर जीवनाच्या प्रवासात आणखी खर्च लागणार आहे. या मुलींना मायेचा आर्थिक आधार देण्यासाठी 8485087982 या क्रमांकावर संपर्क करावा. ’’ तारामती वाघमारे, आजी.

...तोच चारा देतो
ज्याने चोच दिली, तोच चारा देतो. मुले अनाथ झाली, तरीही परमेश्वर ‘आधार’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून मुलांच्या गरजा पूर्ण करीत आहे. अशा संस्थेत सभासद होण्यासाठी दरमहा दहा रुपये दिल्यास सभासद होता येईल. या निधीतून शेकडो गरजू विद्यार्थ्यांना मदत करता येते.’’
जयराम सातपुते, वर्गशिक्षक.