आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये सुवर्णखरेदीसाठी उडाली झुंबड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सोन्याच्या भावात मागील काही दिवसांपासून उच्चांकी घसरण सुरू आहे. मंगळवारी भाव आणखी घसरुन 26 हजार 600 वर आला. भाव कमी झाल्याने शहरातील सराफी दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. उलाढाल वाढल्याने सराफ व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जमीन, फ्लॅट व रोखेबाजारापेक्षा सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे अनेकांचा सोनेखरेदीकडे कल असतो. मागील काही वर्षांत सोन्याच्या भावात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्यामुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. नगर शहरात सुमारे 350 सराफी दुकाने आहे. दररोज सुमारे 12 कोटींची उलाढाल होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नगरमध्ये सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 33 हजार 300 वर गेला होता. मागील काही दिवसांपासून दरात घसरण होत आहे. 9 एप्रिलला भाव 29 हजार 546 होता. 13 एप्रिलला 27 हजार 925 भाव होता. 15 एप्रिलला 26 हजार 380 सोन्याचा भाव झाला. मंगळवारी शहरात सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 26 हजार 600 होता.

मागील तीन वर्षांपासून गुंतवणूकदार सोन्याचे दर कमी होण्याची प्रतीक्षा करत होते. भावात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक सुरू केली आहे. एप्रिलपासून लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या घरात विवाह आहे, त्या घरातील मंडळी सराफी दुकानात सोनेखरेदीसाठी गर्दी करत आहेत.
आणखी 600 रुपयांनी कमी होणार सोन्याचा भाव
अमेरिका व रशिया या देशांमधील आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्यांनी सोने विक्रीसाठी काढले आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात आणखी 600 रुपयांनी घसरण होईल. ऐन लग्नसराईत दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सराफ बाजारात मागील दोन दिवसांपासून सोने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.’’ संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ असोसिएशन.