आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल दरवाढीने महागाईत भर ; नगरकरांची संतप्त प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून 1 रूपया 92 पैशांनी वाढ झाली आहे. नगर शहरात पेट्रोलचा दर आता 75 रुपये 78 पैसे झाला आहे. दरवाढीच्या या निर्णयाबद्दल नगरकरांनी शनिवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. पेट्रोलची दरवाढ होताच अप्रत्यक्षपणे महागाईतही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. त्यामुळे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. वारंवार होणारी पेट्रोलची दरवाढ रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात; अन्यथा जगणे कठीण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

सरकारला देणे-घेणे नाही

पेट्रोल व डिझेलची दरवाढ नेहमीचीच झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल, याच्याशी सरकारला काही देणे-घेणे नाही. आधीच महागाई, त्यात पुन्हा पेट्रोलची दरवाढ. त्यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे. आता दुचाकी वापरणेही कठीण झाले आहे. -विजय बोधे, महापालिका कर्मचारी.

सरकारचे नाटक

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याचे कारण पुढे करून दरवाढ केली जाते. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीपेक्षा पेट्रोल व डिझेलचे दर जास्त असतात. सरकार केवळ नाटक करत असल्याचे यावरून स्पष्ट होते. सर्वसामान्य मात्र त्यात भरडले जातात. -बाबासाहेब महापुरे, इलेक्ट्रिक दुकानदार

ठोस उपाययोजना आवश्यक

पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरवाढ रोखण्यासाठी सरकारने अनुदान उपलब्ध करावे, तसेच स्वत:चे पेट्रोलपंप सुरू करावेत. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांना द्यावे लागणारे कमिशन वाचेल. -मतिन सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

नोकरदारांचे हाल

एमआयडीसीमध्ये नोकरीला असल्याने रोज दुचाकीने जावे लागते. पगारातील मोठी रक्कम पेट्रोलसाठीच खर्च होते. पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नोकरदार मेटाकुटीला आला आहे. -अनिल लहारे, औद्योगिक कर्मचारी.

दरवाढीमुळे महागाई

महागाईत आणखी भर पडणार आहे. महिन्याचा भाजीपाला आणि किराण्याचा खर्च भागवणेही कठीण झाले. घरखर्चाचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. या परिस्थितीत संसार चालवणे म्हणजे कसरतच ठरणार आहे.

-पल्लवी भोसले, गृहिणी.