आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phase To Pumping Station Nearing Completion Work

"फेज टू' पंपिग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे, काम प्रगतिपथावर असल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर सुधारित पाणीपुरवठा (फेज टू) योजनेवरील पंपिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आहे. योजना कार्यन्वित करण्यासाठी ठेकेदार संस्थेला मार्चअखेरची मुदत देण्यात आली आहे. योजनेचे काम प्रगतिपथावर आहे.
लवकरच योजना कार्यान्वित होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत योजना कार्यान्वित झाली नाही, तरी पंपिंग स्टेशनच्या कामामुळे शहराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या फेज टू योजनेचे पाणी कधी मिळेल, याकडे नगरकर डोळे लावून बसले आहेत. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या ११६ कोटी रुपयांच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदार संस्थेने आठ-नऊ महिन्यांपूर्वी योजनेचे काम थांबवले होते. त्यानंतर मनपा प्रशासन पदाधिकाऱ्यांमध्ये वाटाघाटी होऊन योजनेचे काम पुन्हा सुरू झाले. त्यात मुळानगर, विळद, नागापूर वसंत टेकडी येथील पंपिंग स्टेशनच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर झालेल्या आहेत. चारही पंपिंग स्टेशनवर जास्त क्षमतेची मशीनरी बसवण्यात आली आहे. वीज केंद्राचे काम रखडले होते, तेदेखील आता मार्गी लागले आहे. या कामासाठी मनपाने महावितरणकडे आवश्यक तो निधीदेखील जमा केला आहे. त्यामुळे चारही पंपिंग स्टेशनचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. दिलेल्या मुदतीत योजना कार्यान्वित झाली नाही, तरी शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यास या पंपिंग स्टेशनचा लाभ होणार आहे. जून २०१० मध्ये योजनेच्या कामास कार्यांरभ आदेश देण्यात आला, कामाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत महापालिकेत सत्तांतर झाले, काही अधिकारी सेवानिवृत्त झाले, परंतु योजनेचे काम पुढे सरकलेच नाही. योजनेअंतर्गत सुमारे ३५५ किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या; परंतु प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार त्यात २१० किलोमीटरची वाढ करण्यात आली. त्यामुळे योजनेचा खर्चही १५२ कोटींवर गेला. असे असतानाही योजनेच्या कामास अपेक्षित गती मिळालेली नाही. साडेचार वर्षे उलटली, तरी योजनेचे ७० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नगरकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांचाही संताप
फेजटूच्या नावावर सत्ताधारी विराेधकांनी निवडणुका लढवल्या. फेज टूचे पाणी मात्र नागरिकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे नागरिक नगरसेवकांवर आपला रोष व्यक्त करत आहेत.

केडगावला सर्वाधिक लाभ
फेजटू योजनेंतर्गत शहरात टाकण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहिन्या सुरू होतील की नाही, याबाबत शंकाच आहे. योजनेचे यश-अपयश त्यावरच ठरणार आहे. केडगाव पाणी योजनेला मात्र फेज टू योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे. केडगाव पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नळजोडणीनंतर ही योजना कार्यान्वित होणार आहे. केडगाव पाणी योजना १३ किलोमीटरची ऊर्ध्ववाहिनी टाकून नागापूर पंपिंग स्टेशनला जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे फेज टूचे पाणी थेट केडगाव पाणी योजनेला मिळणार आहे.

११६ कोटी रुपये खर्च
६९ कोटी शासनाकडून प्राप्त
५६ कोटी ठेकेदाराला अदा
४.५ वर्षांपासून रखडले काम