आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा 'फेज टू'चा: मवाळ विरोधकांचा पुन्हा १० दिवसांचा अल्टीमेटम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर सुधारित पाणी योजनेच्या (फेज टू) बंद झालेल्या कामाबाबत विरोधकांनीदेखील मवाळ भूमिका घेतली आहे. मागील आठवड्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देणा-या विरोधकांनी महापालिका प्रशासनाला बुधवारी पुन्हा एकदा दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला. दहा दिवसांत काम सुरू झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला असला, तरी त्याची अंमलबजावणी होते की, हे इशा-याचे सत्र असेच सुरू राहते, हे योग्य वेळी स्पष्ट होईल. परंतु प्रशासन, सत्ताधारी, तसेच विरोधकांनादेखील योजनेच्या कामाचे गांभीर्य नसल्याचे सध्या दिसत आहे.

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या फेज टू योजनेचे काम बंद होऊन एक महिना पूर्ण झाला. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फेज टू योजनेचे काम बंद होणे, ही नगरकरांची शोकांतिका आहे. मोठा गाजावाजा करत आश्वासनांची खैरात वाटून सत्तेवर बसलेल्यांना मात्र अद्याप योजनेचे गांभीर्य समजलेले नाही. ते समजले असते, तर एका महिन्यापासून बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असते. महापौर संग्राम जगताप यांनी, तर योजनेचे काम बंद झालेले नसून ते सुरूच असल्याचा हास्यास्पद दावा वारंवार केला. त्यांचा हा दावा कसा फोल आहे, ते "दिव्य मराठी'ने यापूर्वीच दाखवून दिले आहे.

महापालिकेत सध्या एकहाती कारभार सुरू आहे. फेज टूचे काम कधी सुरू होईल, याबाबत आयुक्त विभागप्रमुखांनाही काहीच माहिती नाही. ठेकेदार संस्थेशी महापौर चर्चा करत आहेत, अशी वरवरची उत्तरे गेल्या महिनाभरापासून प्रशासन देत आहे. फेज टू हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रश्नी विराेधक सत्ताधा-यांना जाब विचारतील, अशी भोळ्या-भाबड्या नगरकरांची अपेक्षा आहे. परंतु त्यांची ही अपेक्षा फोल ठरत आहे. विरोधकांनीच तलवारी म्यान केल्या असल्याचे चित्र सध्या आहे. योजनेचे काम आठ दिवसांत सुरू झाले नाही, तर शहरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सेना-भाजपने मागील आठवड्यात दिला होता. परंतु त्यांचा हा इशारा हवेतच विरला. शिवसेनेच्या काही नगरसेवकांना बुधवारी पुन्हा एकदा फेज टूची आठवण झाली. काम कधी सुरू होणार, याबाबत त्यांनी आयुक्तांना जाबही विचारला, परंतु नेहमीप्रमाणे गोड बोलणा-या आयुक्तांनी दहा दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे नगरसेवक पुन्हा दहा दिवसांचा अल्टीमेटम देऊन घरी निघून आले. आता आयुक्तांचे आश्वासन खरे ठरते की, विराेधकांचा अल्टीमेटम, हाच खरा प्रश्न आहे.

भाजप नगरसेवकांना विरोधक असल्याचा विसर
मनपातआपण विराेधी बाकावर बसलो आहोत. सत्ताधा-यांच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे हे आपले आद्य कर्तव्य अाहे, याचा भाजपच्या नगरसेवकांना विसर पडला आहे. फेज टूच्या बंद झालेल्या कामाबाबत शिवसेनेसह भाजपनेदेखील मागील आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु भाजप नगरसेवकांना त्याचा विसर पडला आहे. शिवसेनेने बुधवारी फेज टूच्या कामाबाबत आयुक्तांकडे विचारणा केली, परंतु यावेळी भाजपचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.

आयुक्त म्हणतात तांत्रिक अडचणी...
थकीतनऊ कोटींची बिले मिळाली, तर काम सुरू करण्याबाबत विचार करू, असे ठेकेदार संस्थेचे म्हणणे आहे. परंतु महिना उलटला, तरी सत्ताधारी प्रशासनाने याबाबत तोडगा काढलेला नाही. विशेष म्हणजे महापौर जगताप यांनी त्यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. उलट काम सुरू असल्याचा खोटा दावा त्यांनी केला. काम सुरू करण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे आयुक्त सांगत आहेत. त्यामुळे बंद झालेले फेज टूचे काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

आम्हाला राजकारण करायचे नाही
फेजटू हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यात राजकारण करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. आयुक्तांनी दहा दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. आम्ही मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आयुक्तांच्या विनंतीवरून आम्ही प्रशासनाला १० मेपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले नाही, तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत.'' अनिलशिंदे, नगरसेवक,शिवसेना.
फेज टूचे काम सुरू व्हावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, संजय शेंडगे, संभाजी कदम, सागर बोरुडे आदी.