आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographs, Cartoons And Pictures Display At Nagar Fort

छावणीतील आठवणींचा किल्ल्यात होणार जागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अनेक युद्धबंदी नगरच्या किल्ल्यात व भिंगार परिसरातील बराकींमध्ये ठेवण्यात आले होते. त्यात अनेकजण जर्मन नागरिक होते. त्यांचा पत्रव्यवहार, त्यांनी काढलेली छायाचित्रे, व्यंगचित्रे व चित्रांचे प्रदर्शन १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान नगरच्या भुईकोट किल्ल्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात सर्वांना विनामूल्य पाहता येईल.
पहिल्या महायुद्धाची शताब्दी, नगर शहराच्या स्थापनेचे ५२५ वर्ष व पंडित जवाहरलाल नेहरूंच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संग्रहालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर व या उपक्रमाचे संकल्पक डॉ. शशी धर्माधिकारी यांनी प्रदर्शनाची माहिती मंगळवारी दिली.

एसीसी अँड एसच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाबरोबर चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटलेल्या नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांचे व लष्कराच्या "नो युअर आर्मी' हे प्रदर्शन होणार आहे. यानिमित्ताने चित्रकला व निबंध स्पर्धा, किल्ला दर्शन व रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. नगरची माहिती देणारे "ग्लिमसेस ऑफ अहमदनगर' व डॉ. धर्माधिकारी यांचे जर्मन बंदिवानासंबंधीच्या पुस्तकांचे प्रकाशन १४ ला उदघाटन समारंभात होणार आहे.

मुख्य कॅम्प नगरमध्ये
बोअर लढाई (१९०१-०२), पहिले महायुद्ध (१९१४ ते १९) व दुसऱ्या महायुद्धातील (१९३९/४५) अनेक युद्धकैद्यांना ब्रिटिशांनी नगरला ठेवले होते. त्यात अनेक जर्मन व्यावसाियक, व्यापारी, इंिजनिअर्स, डॉक्टर, तसेच मिशनरीही होते. भारतातील मुख्य कॅम्प नगरला होता. मूळचे नगरचे व सध्या फ्रान्समध्ये स्थायिक असलेले डॉ. शशी धर्माधिकारी यांनी बोअर युद्ध व दोन्ही महायुद्धांसंबंधीची दुर्मिळ कागदपत्रे, छायाचित्रे व पुस्तके जमा केली आहेत. या दस्तऐवजासह बंदिवानांना वाटलेली कुपन्स व इतर पत्रव्यवहार प्रदर्शनात पहायला मिळेल.
जर्मनीमधील वेगवेगळ्या संस्था व वस्तू संग्रहालयांनी या प्रदर्शनासाठी अमूल्य असे दस्तऐवज दिलेआहे. जर्मनीतील बाड साल्जूप्लेन येथील संग्रहालयाचे प्रमुख अरनोल्ड बेऊके, तसेच ब्रेमन या जर्मन गावातील इंडियन फोरम या संस्थेने अनेक जुने फोटो, पत्रव्यवहार, तसेच बंदिवानांनी काढलेली व्यंगचित्रे प्रदर्शनासाठी दिली आहेत.

दुर्मिळ छायाचित्रे
नगरचे पी. करदी नरसू हे ब्रिटिशकाळात फोटोग्राफर होते. त्यांनी १९१५ ते २० दरम्यान काढलेले दुर्मिळ फोटो अमेिरकेतील पेनिसिलवानिया विद्यापीठाने नगरच्या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेआहेत. डॉ. िलओनॉर्ड एल्महर्स्ट हे १९१६ मध्ये नगरच्या वायएमसीएचे सेक्रेटरी होते. त्यांना फोटोग्राफीचा छंद होता. त्यांनी त्यावेळी काढलेले फोटो इंग्लंडच्या डारर्टींगंटन हॉल ट्रस्टने प्रदर्शनासाठी दिलेआहेत.
पर्यटन विकासाबाबत बैठक
नगरचा पर्यटन विकास, तसेच यात लोकांचा सहभाग यासंबंधी सर्वसमावेशक बैठक लवकरच घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कवडे यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुलांमध्ये चैतन्य निर्माण होऊन चांगल्या मूल्यांची रूजवण त्यांच्यात होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
संशोधकांसाठी अमूल्य खजिना
हा सर्व दुर्मिळ दस्तऐवज भारतात पहिल्यांदाच दाखवला जात आहे. अहमदनगर ऐतिहािसक वस्तू संग्रहालयात हे दुर्मिळ दस्तऐवज कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार असून संशोधकांना त्याचा फायदा होणार आहे. पुण्यात एक जर्मन ग्रूप असून त्यांनी हे प्रदर्शन पुण्यातही भरवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले.