नगर- राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे बाळासाहेब विखे यांनी आतापर्यंत अनेकदा पक्ष बदलले. प्रसिध्दी मिळवण्यासाठी आता ते पवार यांच्यावर टीका करत आहेत. वास्तविक विखे हे भाजप सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाट आहेत. राष्ट्रवादीच्या उचापती केल्या, तर त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
विखे यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, शरद पवार यांनी राज्यासह देशाच्या विकासाला चालना दिली. विखे यांनी मात्र वेळोवेळी पक्ष बदलून वैयक्तिक विकास साधला. मंत्री लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कोणतेही ठोस विकासकाम केले नाही. बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव राधाकृष्ण यांनी विरोधी पक्षनेते असतानाही भाजप सरकारशी मिलिभगत केली. विकासाचा पुळका असेल, तर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास विखे मागे का राहतात. खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या विखे यांच्या वक्तव्यास विशेष िकंमत देण्याची गरज नाही. शाहू, फुले, आंबेडकरांनंतर आम्हाला शरद पवार प्रिय आहेत. त्यामुळेच विखेंवर बोलत असल्याचे स्पष्टीकरणही पिचड यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महिनाभराच्या अपॉईंटमेंट तपासल्यास सर्वाधिक भेटी विराेधी पक्षनेते विखे यांनीच घेतल्या असल्याचे स्पष्ट होईल. दोन वर्षांपूर्वी विखे यांनी लोणीत पवारांवर स्तुतिसुमने उधळली होती. आता टीका करणाऱ्या लोणीकरांनी त्याची तपासणी करावी. भाजपची भाटगिरी राजकीय कोलांटउड्या मारण्याऐवजी विखे यांनी दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे काम करणे आवश्यक आहे. पवारांचे नेतृत्व राष्ट्राने मान्य केले आहे. विखेंसारख्या केवळ ४० गावांच्या छोट्या पुढाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जेलभरो
सरकारलाएकही प्रश्न समजलेला नाही. सरकार दुष्काळग्रस्तांची दिशाभूल करत आहे. सरकारने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. सध्याच्या उपाययोजना चुकीच्या पध्दतीने सुरू आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे १६ सप्टेंबरला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कायार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांिगतले.