आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर खड्डे मावेनात, दालन मात्र चकचकीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकीकडे नगरच्या बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक विभागाकडे निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या रोजगार हमी योजना विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांचे दालन, तसेच बैठक कक्ष (मीटिंग हॉल) व अभ्यागत कक्षाच्या नूतनीकरणावर लाखोंचा खर्च करण्यात आला.
नगरचा बाह्यवळण रस्ता सध्या प्रचंड उखडला आहे. एक किलोमीटर जाण्यासाठी वाहनांना १५ ते २० मिनिटे लागत आहेत. शहरात अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवली आहे. औरंगाबाद ते पुणे व मनमाड ते पुणे या रस्त्यांवरून शहरात येणारी सर्व वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाखांचा निधी मंजूर केला होता. तो अद्याप दिला नसल्याने या रस्त्याचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे या रस्त्याने जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे, ते वेगळेच. अशा स्थितीत रस्त्याच्या दुरुस्तीला सर्वोच्च प्राथमिकता देणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मात्र आपल्या केबिनचे नूतनीकरण करण्यात मग्न आहेत.
पैशांची अनावश्यक उधळपट्टी
कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली १४ लाख ९९ हजारांचा खर्च केला जात आहे. सर्व जुन्या टाइल्स काढून नव्या चकचकीत टाइल्स बसवल्या जात आहेत. जिन्यांत ग्रेनाइट बसवण्यात आले आहे. जुन्या सागवानी चौकटी व दरवाजे काढून तेथे तकलादू प्लायवूडचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. चकाचक करण्याच्या नावाखाली याआधी बसवलेल्या टाइल्स काढून तेथे नवीन बसवल्या जात आहेत. विशेष म्हणजे गरज नसताना हे सर्व केले जात आहे.

कोठे वाचवला पैसा?
हा पैसा विविध कामांतून वाचवल्याचे सार्वजनिक बांधकामतर्फे सांगण्यात आले. राहुरीच्या आयटीआयमधील मुलांच्या वसतिगृहाचे काम (दोन लाख), राहुरी-सोनई रस्त्यावरील पूल : १ लाख ७६ हजार, बाह्यवळण रस्ता (केडगाव ते अरणगाव टप्पा) : सव्वा तीन लाख, नेवासे येथील प्रशासकीय इमारत : सात लाख ९७ हजार. एकूण वाचवलेली रक्कम : १४ लाख ९८ हजार. हे काम विनानिविदा देता यावे, म्हणून बरोबर १५ लाखांच्या आता दाखवण्याची ‘किमया’ही साध्य करण्यात आली आहे.

काय सांगतो नियम?
सार्वजनिक बांधकामच्या धोरणानुसार इमारतींच्या छताला काटकसर म्हणून प्लास्टर केले जात नाही. या इमारतीच्या छताला त्यानुसार प्लास्टर नव्हते. आता मात्र महागडे प्लास्टर ऑफ पॅरिसचे फॉल्स सीलिंग (आभासी छत) तयार करण्यात आले आहे. आपल्याच नियमांना फाटा देण्याचा प्रकार येथे करण्यात आला. विशेष म्हणजे, हा सर्व खर्च करण्यात आला, पण येथे बसण्यास अधिकाऱ्यांना वेळ आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आठवड्यातील चार दिवस येथे अधिकारीच उपस्थित नसतात. त्यासाठी दौऱ्यांचे कारण पुढे केले जाते. अशीच िस्थती या अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांची आहे. तेथेही कोणी राहत नाही. सरकारने केलेला खर्च वाया गेला आहे. शिवाय तेथे सरकारला कोणी भाडेकरूही ठेवता येत नाही.
निर्ढावलेपणाचा कळस
*मुळात पैसा ज्या कामांतून वाचवला, त्यांच्या अंदाजपत्रकांतील आकडे फुगवलेले असतात. त्यामुळे तेथून पैसा वाचला असे दाखवून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्ढावलेपणाचा कळस आहे. संबंधित कामामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामातील तत्परता वाढणार आहे का, असा प्रश्न आहे.” प्रमोद मोहोळे, सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान