आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालबत्ती आणि इतर कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लालबत्ती’ हा शब्द ऐकताच, वाचताच प्रत्येक व्यक्ती क्षणभर का होईना दचकते. काहींच्या मनात तिरस्कार, तुच्छता, कुतूहल, तर काहींच्या मनात दया, हताशता अशा भावना निर्माण होतील. पण कितीजण विचार करतात की, इथली असलेली प्रत्येक ‘ती’ हवशी-नवशी-गवशी नसते. तिच्याही काही मजबुरी असतील, तिलाही मन आहे, भावना आहेत आणि वेदनाही आहेत. अशाच काही वेदनांचा परिचय होतो तो प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांच्या ‘लालबत्ती आणि इतर कविता’ या संग्रहात.

या संग्रहात चार विभाग आहेत. पहिला विभाग आहे तो ‘लालबत्ती’. वेश्या ही कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, बायको आहे आणि आईही आहे. कोणाला पळवून आणलेले असते, तर कोणाला फसवून आणलेले असते, तर कोणी स्वत: इतके अगतिक असते की, जर्जर आई-वडील, लकवा मारलेला नवरा, परिस्थितीने नागावलेली मुलं, मुलांची शाळा, वह्या, पुस्तकं, औषधाची उधारी, सावकारी यांची उत्तर शोधता शोधता ती लालबत्तीत पोहोचलेली असते. शेवटी जेव्हा तिला एड्स होतो तेव्हा तिला स्वत:ला जगायची आणि इतरांना जगवण्याची उमेद संपते. ज्या माऊलीने तिला जन्म दिला आहे, तिचे दु:ख, तर शब्दांच्या पलीकडचे आहे आणि म्हणूनच ती माऊली इतर स्त्रियांना अशी कूस न उजवण्याचा सल्ला ‘गार्‍हाणं’ कवितेत देते.

संग्रहाचा दुसरा विभाग आहे तो कुणब्याच्या कवितांचा. आपला देश कृषिप्रधान असला, तरी शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पाऊस न पडल्यामुळे जीव लावून जपलेली जनावरं शेतकर्‍याला कसायाच्या स्वाधीन करावी लागतात. पांढर्‍या सोन्यानं दगा दिल्याने त्याला गोठय़ातलं जनावर मोकळं सोडून स्वत:च्या गळ्याला दावं लावावं लागतं. या कुणब्याची पत्नी सोशिकपणे त्याची साथ देत असते. ‘पीकपाणी’ कवितेत याचं चित्रण आहे.

कुणब्याचं पहिलं काम म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे पंढरीची वारी. पण नियमित वारी करूनही त्याला त्याच्या विठूरायाने काही दिलं नाही आणि सरकारही काही देईल अशी तो अपेक्षा करीत नाही, कारण -

सरकारी योजना, आल्या तशा गेल्या
भाडखाऊ पुढार्‍यांनी, भरविल्या झोळ्या म्हणूनच तो विठ्ठलाला ‘काळ्याई’च्या पोटात मोक्ष देण्याची विनंती करतो.
संग्रहातील तिसरा विभाग आहे तो ‘सिस्टिम’ विषयीच्या कवितांचा. भ्रष्टाचार, लोकशाही, राजकारण, समाजकारण, जागतिकीकरण, शिक्षण व्यवस्था, बालकामगार, बालहक्क, मंत्र्यांचे विविध घोटाळे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, काळाबाजार, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्त्रियांची होणारी कुचंबणा, त्यांच्यावर होणारे अत्याचार, गँगरेप अशा विविध कंगोर्‍यांना कवीने स्पश्र केला आहे. ग्लोबलायझेशन आणि त्यामुळे होणारा संस्कृतीचा बट्टय़ाबोळ यांचेही चित्र कवितेत उमटले आहे.

संग्रहाचा शेवटचा विभाग आहे तो खास ‘मनातल्या’ कवितांचा. आपलं रोजचं आयुष्य कितीही धकाधकीचं असलं, तरी एखाद्या बेसावध क्षणी गतकाळातील आठवणी जाग्या होतात. अशा आठवणींकडे कितीही तटस्थपणे पाहिलं, तरी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. कधी कधी अंगभर मोरपिस फिरवल्याचा हृद्य पुन:प्रत्यय येतो. प्रत्येक कवितेची भाषा साधी, सोपी आणि ओघवती आहे. विशेषत: ‘लालबत्ती’ कविता वाचल्यानंतर मन काही क्षण सुन्न होते..