आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना पॅकेज नको, विश्वास द्या...- कवी इंद्रजित भालेराव यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काट्या कुट्याचा तुडवत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, कुणब्याच्या पोरा लढायला शिक, घेतलेले कर्ज बुडवायला शिक, माझ्या बापानं नाही केला पेरा..., यासह ४५० हून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कविता लिहिणारे व ३० शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कथासंग्रह व ललित लेखन भालेराव यांनी िलहिले आहे. "आम्ही कबाडाचे धनी' या कविता संग्रहाच्या तब्बल १० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. १९९३ साली या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमात भालेराव यांची किमान एक कविता आहे. भालेराव म्हणाले, शेतकऱ्यांना पॅकेज नको आहे, त्याला जगण्याचा विश्‍वास हवा आहे. सरकार पॅकेज जाहीर करते, पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. सरकारी मदत मिळाली, तरी ती अपमानीत करून दिली जाते. भीक नको, पण कुत्रं आवर..., अशी स्थिती या पॅकेजची झाली आहे. शेतकऱ्यांना जगण्याचा विश्‍वास मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपची सत्ता असताना राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. मधल्या काळात सरकार बदललेले. आता पुन्हा युती सरकार आले, तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा िदल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. साहित्यातून जगण्याची ऊर्मी मिळते, साहित्यातून जगण्याची दिशा मिळते, म्हणून माझ्या कविता या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणाऱ्या आहेत, असे भालेराव यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले ,
शेतकऱ्यांना आपल्या आयुष्याचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात.
शेतकऱ्यांनी विचारले,
देशाचे नियोजन करता आले नाही
म्हणून आतापर्यंत
किती पंतप्रधानांनी आमहत्या केल्या..
.

या कवितेच्या ओळी म्हणत शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्र मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी िवदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या सरकारवर प्रखर शब्दांत टीका केली.
शब्दगंध साहित्य संमेलनासाठी भालेराव नगरमध्ये आले असता त्यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधला.
पाण्यात राजकारण नको...
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात तीन मोठी धरणे झाली. त्यानंतर मराठवाड्यातून अनेक मुख्यमंत्री, मंत्री झाले. मात्र, तशी धरणांची कामे झाली नाहीत. चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमुळे मराठवाड्यातील काही भाग समृध्द झाला. जायकवाडीला पाणी सोडण्यावरून वाद सुरू आहे. तथापि, पाणी हे सर्वांना समप्रमाणात मिळायला हवे. यात कुठलेही राजकारण येता कामा नये, अशी अपेक्षा कवी भालेराव यांनी व्यक्त केली.