आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीच्या मायाजालात फसू नका : लहू कनडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माहितीचे मायाजाल फसवू असू शकते. सध्या केबल, मोबाइल, इंटरनेट आणि जाहिरातींच्या माध्यमातून अनावश्यक माहिती विनासायास विद्यार्थ्यांवर थोपवली जात आहे. पण ही माहिती म्हणजे ज्ञान नाही. या माहितीतून परिश्रमपूर्वक ज्ञान निवडून घेण्याचे आव्हान आज विद्यार्थ्यांसमोर उभे आहे. माहितीच्या महाजालात विद्यार्थ्यांची फसगत न होता त्यांना सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन कवी लहू कानडे यांनी केले.
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलने आयोजित केलेल्या साहित्यिक तुमच्या भेटीला या उपक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कानडे बोलत होते. मी याच शाळेत शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले. माझी वैचारिक व साहित्यिक जडणघडण याच परिसरात झाली, असे सांगून कानडे म्हणाले, प्रत्येक शिक्षक हा कवी असावाच लागतो. त्याशिवाय त्याचे संवेदनशील असणे शक्य नाही. तळागाळातील वंचितांच्या वेदना मांडण्याचे काम करणारी माझी कविता दहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाली ही माझ्यातील शिक्षकाला सुखावणारी बाब आहे. कानडे यांनी कविता, कवींचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या प्रेरणा या संबंधीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. प्रा. रमेश भारदे यांनी कानडे यांचा सत्कार केला. यावेळी प्र. ह. कुलकर्णी, प्राचार्य गोरक्ष बडे, मदन मुळे, छबूराव ठोकळ उपस्थित होते. शाळेतील कवितेची बाग या प्रकल्पात लहू कानडे यांच्या "निवडून नेमके घ्या ज्ञान' या काव्यफलकाचे अनावरण त्यांच्याच हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उमेश घेवरीकर, सुयोग बकोरे, अभिषेक जोशी, मीनाक्षी शिंदे यांनी केले. यावेळी आदर्श विद्यामंदिर व भारदे हायस्कूलमधील ५०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाला कानडे कवितेचे भित्तीपत्रक देण्यात आले.