आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Bharti Fake Candidate Arrested And Police Custody

पोलिस भरतीत फसवणूक करणार्‍यांना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी व लेखी परीक्षेला बनावट उमेदवार बसवणार्‍या दोघांना मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. राजकारणे यांनी सोमवारी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली. याप्रकरणी सातजणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात 9 जूनला रात्री गुन्हा दाखल झाला असून आणखी काही बनावट उमेदवार निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

अर्जुन सीताराम घुणावत (राजेवाडी, बदनापूर, जि. जालना) व सज्जन दिलीप लोखंडे (उरूडकाझी, औरंगाबाद) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घुणावत याने पाचशे मीटर धावण्याची चाचणी स्वत: दिली. उर्वरित मैदानी चाचण्या व लेखी परीक्षा घुणावतच्या जागेवर लोखंडे याने दिल्या. गृहशाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश गायधनी यांनी मूळ व बनावट अशा सात उमेदवारांविरुद्ध फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

सोमवारी घुणावत व लोखंडेला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने रजनी देशपांडे यांनी बाजू मांडली. आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने घ्यावयाचे आहेत. यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.