आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - जिल्हा पोलिस दलाकडून 124 जागांसाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत पोलिस बनण्यासाठी आलेल्या तीन उमेदवारांनी बनावट व्यक्ती उभ्या करून पोलिस प्रशासनाचीच फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गृह विभागाचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश गायधनी यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अर्जुन सीताराम घुणावत (चेस्ट क्रमांक 14345), चरणसिंग हिराचंद जोणवाल (चेस्ट क्रमांक 10508), गोपाल रतनसिंग ब्रम्हनाथ (चेस्ट क्रमांक 8611) ऑनलाइन अर्ज भरणार्या या उमेदवारांनी पोलिसांनाच मामा बनवण्याचा प्रयत्न केला. यातील घुणावत याने अंतरिम निवडयादीत खुल्या प्रवर्गात 18 वे स्थान मिळवले आहे. मात्र, एक निनावी तक्रार व सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेजमुळे त्याचे बिंग फुटले. बनावट उमेदवार बसवून पोलिस बनण्याचा त्यांचा उद्देश सपशेल फेल ठरून कोठडीची हवा खाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
घुणावतने पुलअप्स, गोळाफेक, लांब उडी व 100 मीटर धावण्याच्या चाचणीसाठी सज्जन दिलीप लोखंडे (उरूडकाझी, औरंगाबाद) याला उभे केले. 500 मीटर धावण्याची चाचणी त्याने स्वत: दिली. लेखी परिक्षेसाठी कल्याण जोनवाल (लांडकवाडी, औरंगाबाद) या तोतया उमेदवाराला त्याने बसवले.
चरणसिंग जोनवाल याने तर कहरच केला. मैदानी चाचणीच्या चार प्रकारांसाठी वेगळा तोतया, पाचशे मीटर धावण्यासाठी दुसरा तोतया व लेखी परिक्षेसाठी आणखी एक तोतया उमेदवार त्याने बसवल्याचे स्पष्ट झाले. गोपाल ब्रम्हनाथ याच्या जागेवर राम बुधासिंग खोकड या तोतया व्यक्तीने मैदानी चाचण्या व लेखी परीक्षा दिल्याचे उघडकीस आले. किरण कवाळे (रामदूलवाडी, बदनापूर, जालना) या डमी उमेदवाराचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
मूळ उमेदवार व त्यांच्या जागेवर चाचणी, परीक्षा देणार्यांनी संगनमत करून भरती प्रक्रियेत पात्र ठरून शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. यातील अर्जुन घुणावत व सज्जन लोखंडे यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी (10 जून) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गुन्हा दाखल झालेले आरोपी : अर्जून घुणावत, चरणसिंग जोणवाल, गोपाल ब्रम्हनात, सज्जन लोखंडे, कल्याण जोनवाल, किरण कवाळे, राम खोकड. याशिवाय इतर तोतया उमेदवारांचा फिर्यादीत उल्लेख आहे.
निवड यादीला विलंब
बनावट व्यक्तींना उभे करून अंतरिम निवड यादीत स्थान मिळवणार्या उमेदवारांची संख्या तीनवर पोहोचली आहे. आणखी काही उमेदवार सापडण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सीसीटिव्ही कॅमेर्याचे चित्रण तपासण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम निवड यादी जाहीर होण्यास आणखी तीन-चार दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अधिक हुंड्यासाठीचा खटाटोप नडला
बनावट उमेदवारांच्या नावावर मैदानी चाचणी व लेखी परीक्षा देऊन अंतरिम निवड यादीत स्थान मिळवल्याप्रकरणी निष्पन्न झालेले तिन्ही उमेदवार एका विशिष्ट समाजाचे आहेत. पोलिसात भरती झालेल्या उमेदवाराला मिळणारी हुंड्याची रक्कम मोठी असल्याने त्यांनी हा खटाटोप केल्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.