आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी नगरसेवकाच्या अटकेसाठी पोलिसांविरोधात याचिका दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन चार महिने उलटत आले, तरी माजी नगरसेवक विनोद रुपसिंग कदम याला अटक न करणार्‍या पोलिस प्रशासनाविरुद्ध पीडित महिलेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या सोमवारी (12 ऑगष्ट) या याचिकेवर सुनावणी होईल.

महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कदमने लैंगिक शोषण करुन फसवणूक केल्याच्या पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात 19 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासूनच तालुका पोलिसांनी आरोपीला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात आरोपीला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची संधी पोलिसांच्या या भूमिकेमुळे मिळाली. दोन्ही न्यायालयांकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही आरोपीला अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असे नमूद करत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष रजनी शेट्टी यांनी पीडित महिलेबरोबर जिल्हा पोलिस अधीक्षक व तालुका पोलिस ठाणेप्रमुखांची भेट घेऊन कदम याच्या अटकेच्या मागणीचे निवेदन दिले. मात्र, अटकेची कारवाई होऊ शकली नाही. गुन्हा दाखल होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी आरोपीला अटक करण्यास पोलिस जाणिवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने पीडित महिलेने खंडपीठात धाव घेतली आहे.

गंभीर गुन्ह्याबाबत पोलिस असंवेदनशिलता दाखवत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाच्या विरुद्ध खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती चिमा यांच्या पीठासमोर या याचिकेवर 12 ऑगस्टला सुनावणी होणार असून संबंधितांना खंडपीठाने नोटिसा रवाना केल्या आहेत. पीडित महिलेच्या वतीने अँड. नारायण नरवडे हे खंडपीठात बाजू मांडणार आहेत.

आरोपीकडून न्यायालयाची दिशाभूल
आरोपी कदमच्या वतीने जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. जिल्हा न्यायालय व खंडपीठात दाखल झालेल्या अर्जामध्ये आरोपीने नमूद केलेल्या स्वत:च्या पत्त्यांमध्ये तफावत असल्याचे पीडित महिलेने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीने न्यायालयाचीही दिशाभूल केल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.

धमक्यांच्या तक्रारीनंतरही पोलिस ढिम्मच..
फिर्याद मागे घेण्यासाठी दबावतंत्र व धमक्या आल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली होती. कोतवाली पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षकांकडे या तक्रारी करण्यात आल्या. मात्र, पोलिस प्रशासनाने पीडित महिलेच्या या तक्रारींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. आरोपीला राजकीय संरक्षण असल्यानेच कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.