आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी मागवली मनपाकडून माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांनी संगनमताने जुन्या पथदिव्यांच्या लाखो रुपयांच्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली, अशी तक्रार शाकीर शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी दिली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्यासाठी महापालिकेकडून अधिक माहिती मागवली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

नगरोत्थान अभियानांतर्गत शहराच्या विविध भागांत पथदिवे व एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. सुमारे दहा कोटी रुपयांची ही कामे चार ठेकेदार संस्थांना विभागून देण्यात आली होती. नवीन पथदिवे बसवल्यानंतर जुन्या पथदिव्यांचे साहित्य महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक आहे, परंतु मनपाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांनी संगनमत करून या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी शेख यांनी सहा महिन्यांपूर्वी ताेफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली, परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेख यांनी याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठपुरावा केला, परंतु तेथूनही त्यांचा तक्रार अर्ज गायब झाला. त्यामुळे शेख यांनी थेट अितरिक्त मुख्य गृह सचिव व पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली. त्यानंतर येथील पोलिसांनी चौकशीचे सूत्र हलवले. चौकशी अधिकारी म्हणून एका पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने पथदिव्यांच्या जुन्या साहित्याबाबत महापालिकेकडे माहिती मागवली आहे. याप्रकरणी शेख यांनी ठेकेदार संस्था अमित इंजिनिअर्स, प्रत्यक्ष काम करणारे स्थानिक ठेकेदार रसिक कोठारी, मनपाचे शहर अभियंता नंदकुमार मगर व विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जुन्या साहित्यामध्ये ४० वॅट ट्यूब फिटिंग, १५० वॅट सोडियम फिटिंग, ४ बाय ३६ वॅट एनर्जी सेव्हिंग फिटिंगचे बाराशे नग, लोखंडी ब्रॅकेटचे बाराशे नग, तसेच लोखंडी क्लॅम्पचा समावेश आहे. या साहित्याची संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे शहर अभियंता मगर यांनी संबंधित ठेकेदारांना हे साहित्य जमा करण्याबाबत नोटीस बजावली होती, परंतु ठेकेदाराने या नोटिसीला केराची टोपली दाखवली. मनपा प्रशासनाने मात्र केवळ एक नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आता या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून होणार असल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
पथदिव्यांच्या नवीन कामातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रण दक्षता मंडळाकडून गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यासाठी मंडळाने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली अाहे. त्यामुळे पथदिव्यांचे नवीन काम व जुन्या पथदिव्यांच्या साहित्यात झालेला गैरव्यवहार लवकरच उघड होणार आहे.
ठेकेदारांना नगरसेवकांचा आधार
नवीन पथदिवे बसवताना जुने साहित्य नगरसेवकांनी ताब्यात घेतले आहे, असे पत्र ठेकेदारांनी महापालिकेला दिले आहे. साहित्य घेतले असल्याचे १४ नगरसेवकांची पत्रेदेखील ठेकेदाराने दिली आहेत. त्यात माजी महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, अशोक बडे, किशोर डागवाले, गणेश भाेसले, नज्जू पहिलवान, संग्राम जगताप आदींचा समावेश आहे. जुने साहित्य गायब झाल्याचे समोर आल्यानंतर उशिरा ही पत्रे देण्यात आली आहेत. िवशेष म्हणजे या नगरसेवकांनी या जुन्या साहित्याचे काय केले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयातही याचिका
पोलिसांकडे तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याने शेख यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांची ही याचिका जनहित याचिका म्हणून वर्ग केली आहे. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.