आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाचा खून करणाऱ्या "पिन्या'चा लागेना तपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शेवगाव येथील पोलिस दीपक कोलते यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पिन्या ऊर्फ सुरेश भरत कापसे याची शोधमोहीम पुन्हा थंडावली आहे. कोलते यांच्या खुनाला चार महिने झाले असले, तरी अजूनही मुख्य आरोपी सापडलेला नाही. तो परराज्यात पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिन्या कापसेच्या शोधाकरिता नेमलेल्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बढतीवर बदली झाली. त्यामुळे तपास मोहीम पुन्हा एकदा थंडावली आहे.
फेब्रुवारीत कोलते यांचा खून झाला. आरोपी पिन्या कापसे त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर वार केले होते. तेव्हापासून पिन्याचा शोध सुरू आहे. गुंडाने केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा खून झाल्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण बरेच गाजले. कामात कुचराई केल्याबद्दल स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर व्यापक मोहीम राबवून पिन्याचा शोध सुरू झाला. मात्र, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पिन्याच्या संपर्कात असलेले काही पोलिस कर्मचारी आणि काही गुन्हेगार यांच्या मदतीनेही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यातही पोलिसांना अपयश आले.

दरम्यानच्या काळात जलि्ह्यात विविध घटना घडल्यामुळे या गुन्ह्याचा तपास मागे पडत गेला. पिन्याच्या मागावर नेमलेली तपास पथकेही अन्य कामांत गुंतली. प्रकरण राज्यभर गाजल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस पिन्याचा कसून तपास करण्यात आला. पण, तो सापडला नाही. तेव्हाच तो परराज्यात पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक पिन्या हा स्थानिक पातळीवरील आरोपी असल्यामुळे त्याचा बाहेरच्या राज्यात फारसा संपर्क असण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला नक्कीच स्थानिक पातळीवरील इतर गुन्हेगार किंवा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची मदत मिळत असावी, अशी शंका व्यक्त होत आहे. अशी मदत कोण करते, हे शोधून पिन्याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

पुन्हा नव्या पथकाची गरज
पिन्याकापसेचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेची दोन तपास पथके नेमण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील टोणपे हे एका पथकाचे नेतृत्व करत होते. दुसरे पथकही कार्यरत होते. दरम्यानच्या काळात इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्यामुळे एक पथक इतरत्र कार्यरत झाले. टोणपे यांचे पथक महिन्यांपासून पिन्याचा ठावठिकाणा शोधत होते. मात्र, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांची बदली झाल्यामुळे टोणपे यांच्याकडे तोफखान्याचा पदभार आला. तेव्हापासूनच पिन्याचा तपास थंडावला. आता टोणपे यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे कापसेच्या शोधाकरिता पुन्हा नव्याने तपास पथक नेमावे लागणार आहे.

वर्दीच्या इभ्रतीचा सवाल
पिन्याकापसेच्या टोळीविरुद्ध पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी पाठवलेला मोक्का अंतर्गतचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे पिन्याच्या टोळीला मोक्का लागला आहे. पण, चार महिने उलटूनही पिन्या सापडत नसल्यामुळे त्याला शोधणे हा आता पोलिसांच्या इभ्रतीचा सवाल झाला आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनीही बदली झाल्यानंतर पिन्याचा शोध घेण्यात अपयश अाल्याची खंत व्यक्त केली होती. नव्या पोलिस अधिकाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. पिन्या हा स्थानिक पातळीवरचा गुन्हेगार असल्यामुळे त्याचा शोध घेणे तसे पोलिसांना अवघड नव्हते. पण, चार महिने उलटूनही तो पोलिसांना सापडलेला नाही. यावरुन पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कमजोर पडल्याचे स्पष्ट आहे.
बातम्या आणखी आहेत...