आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी संस्थानच्या गार्डला इन्स्पेक्टरची मारहाण, भाविकांत संताप व्यक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबा मंदिर परिसरात दोन पोलिस अधिका-यांनी आपल्या पदाचा रुबाब गाजवत साई संस्थानच्या साई मंदिराच्या सभामंडपाजवळ असणा-या सुरक्षा कर्मचा-यास मारहाण करत साईंच्या दरबारात पोलिस खात्याची दबंगगिरी दाखवून दिली. ड्यूटीवर असणा-या सुरक्षारक्षकास मारहाण होत असल्याचे पाहून साईभक्तांची धांदल उडाल्याने पळापळ झाली. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.

धुळे जिल्ह्यातील एका ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे हे कुटुंबीयांसोबत दर्शनासाठी आले होते. साईं मंदिर सुरक्षा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक विजय शंकरराव टिकोळे हे शिंदे यांना दर्शनासाठी घेऊन मंदिराच्या सभामंडपाजवळील प्रवेशद्वाराजवळ पोहाेचले. दर्शनाचा पास नसल्याने या ठिकाणी ड्यूटीवर असलेले संस्थानचे कर्मचारी वाल्मीक नाजीरे यांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला. तेव्हा पोलिस निरीक्षक टिकोळे यांचा राग अनावर झाला. त्यांनी संस्थान कर्मचारी नाजीरे यांना मारहाण केली. पोलिस निरीक्षक शिंदे यांनीही नजीरे यांना मारहाण केली.
त्यावर संस्थानच्या कर्मचा-याने विनंती करीत ‘साहेब, आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्ही पास घेउन या’ असे सांगताच सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. यामुळे पोलिस व संस्थान कर्मचारी या ठिकाणी जमा झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये टिपले गेले आहे.

सर्व संस्थान कर्मचारी व पोलिस अधिकारी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी गंगावणे यांच्याकडे पोहाेचले. संतप्त झालेल्या उपस्थित संस्थानच्या कर्मचा-यांनी मारहाण करणा-या पोलिस अधिका-यांवर कारवाईची मागणी केली. वातावरण चांगलेच तापल्याचे पाहून शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ हे कर्मचा-यांसह मंदिर परिसरात पोहोचले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच मारहाण करणा-या सबंधित पोलिस अधिका-यांना शिर्डी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर संस्थानचे अधिकारी व पोलिस ठाण्याचे अधिकारी यांच्यात पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीतील चर्चा समजू शकली नाही. दरम्यान, याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नसल्याने कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. पोलिस व संस्थान सुरक्षा कर्मचारी यांच्यात साईदर्शनास सोडण्याहून नेहमीच वाद होत असतात.

शिर्डी-साईमंदिरात दर्शनासाठी जाण्यास मज्जाव केल्याने पोलिस अधिका-यांनी संस्थान सुरक्षारक्षकास मारहाण केल्याने वाद निर्माण झाला. (छायाचित्र)

दोषींवर कारवाई करू
मला सदर घटना समजली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करू.
-सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस प्रमुख,अहमदनगर