आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतीसाठी पैसे घेणारा पोलिस नाईक निलंबित,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोलिस भरती प्रक्रियेत मुख्यालयातील एका पोलिसाने एका उमेदवाराच्या नातेवाईकाकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पैसे देणारी महिलाही पोलिस कर्मचारीच आहे. याबाबत आधी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. पण याची कुणकुण प्रसारमाध्यमांना लागल्यामुळे अखेर संबंधितांची चौकशी करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाग पडले. चौकशीत तथ्य समोर आल्यामुळे पोलिस नाईक एम. के. शेलार याला निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे राज्यभर पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २९ मार्चपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा पोलिस दलातील ४९ जागांसाठी तब्बल हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले होते. प्राथमिक टप्प्यात उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ५० पेक्षा अधिक गुण मिळालेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले. नंतर तिसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. अाता लेखी परीक्षेची अंतिम यादीही जाहीर करण्यात आली आहे.

पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने केली जाईल, असे स्पष्ट केले होते. पोलिस दलातील किंवा बाहेरील कोणीही पोलिस भरतीमध्ये आमिष किंवा प्रलोभन दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, तर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण पोलिस भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. शिवाय मैदानी चाचण्यांचे सीसीटीव्ही चित्रीकरणही करण्यात आले आहे. लेखी परीक्षेची अान्सर की पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.

पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक टप्प्यात गुण जाहीर केल्यानंतर उमेदवारांना आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. हे आक्षेप नोंदवल्यानंतर, उमेदवारांचे शंका निरसन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात आली. १७ एप्रिलला सुमारे ७७१ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. परंतु असे असतानाही मुख्यालयात नेमणुकीला असलेल्या पोलिस नाईक एम. के. शेलार याने एका महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला भरती करुन घेण्याचे आमिष दाखवत ७० हजार रुपये उकळले. पण तो उमेदवार मैदानी चाचणीतच अपात्र ठरल्यामुळे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरला नाही.

त्यामुळे पैसे देणाऱ्या उमेदवाराच्या नातेवाईक महिलेने शेलारकडे पैसे परत मागितले. शेलारने घेतलेल्या रकमेपैकी काही रक्कम तिला परत केली, पण उर्वरित रक्कम देण्यास ताे टाळाटाळ करत होता. शिवाय हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असेही त्याने महिलेला सांगितले होते. त्यामुळे अखेर त्या महिलेने वरिष्ठांनाच भेटून आपले पैसे परत मागितले. त्यानंतर ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे शेलार याला अचानक श्रीरामपुरात बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आले. एव्हाना या प्रकाराची कुणकुण प्रसारमाध्यमांनाही लागल्यामुळे हा प्रकार उजेडात आला.

आधी ठेवले कानावर हात
पोलिसभरती प्रक्रियेत आमिष दाखवत शेलारने पैसे उकळल्याची कुणकुण प्रसारमाध्यमांना लागली. याबाबत विचारणा केली असता पोलिस दलाने आधी कानावर हात ठेवले होते. पण, वरिष्ठांच्या नावाने शेलारने पैसे घेतल्याची वृत्त सगळीकडे पसरताच या प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी सुरु केली. पैसे देणाऱ्या महिलेचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे प्राथमिक चौकशी सोपवण्यात आली. त्यांच्या चौकशीअंती घडलेल्या प्रकारात तथ्य आढळून आल्यामुळे अखेर शेलारवर निलंबनाची कारवाई करावी लागली.

अचानक श्रीरामपुरात बंदोबस्त
पोलिसनाईक एम. के. शेलार हा पोलिस मुख्यालयात नेमणुकीला आहे. मुख्यालयाच्या देखभालीची जबाबदारी त्याच्यावर आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सफाई कर्मचारी म्हणून नेमणुकीला असलेल्या महिलेकडून त्याने ७० हजार रुपये उकळले. पण संबंधित उमेदवार मैदानी चाचणीतच अपात्र ठरला. त्यामुळे महिलेने आपले पैसे परत करण्याचा तगादा लावला. पूर्ण पैसे परत मिळेनात म्हणून महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली. तोपर्यंत शेलार याला श्रीरामपुरात बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. त्याला अचानक श्रीरामपुरात का नेमले, याबाबतही आता शंका उपस्थित होत आहे.

भरती प्रक्रिया पारदर्शकच
पोलिस भरती प्रक्रियेतच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता ठेवली आहे. प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ चित्रीकरण केलेले आहे. शंका असलेल्या उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली. त्यांचे शंकानिरसनही केले आहे. कोणीही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे उमेदवारांनी कोणतीही शंका मनात आणू नये. एका पोलिसाने पैसे घेतल्याची तक्रार येताच चौकशी केली. पोलिस दलातील किंवा इतर कोणी असा प्रकार केला असेल, तर त्वरीत तक्रार देण्यासाठी पुढे यावे, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हापोलिस अधीक्षक.