आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवख्यांपुढे आव्हान सुव्यवस्था राखण्याचे , बंदोबस्ताचा ताण वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षकपदी बदलून आलेल्या नव्या अधिका-यांमुळे आठ पैकी अवघी एकच जागा तांत्रिक कारणामुळे रिक्त आहे. अलीकडेच झालेल्या बदल्यामुळे चार उपअधीक्षक नव्याने आले आहेत. आगामी काळातील सण, उत्सवाचा बंदोबस्त जिल्ह्यातील गुन्हेगारी लक्षात घेता नव्या अधिका-यांवर कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान आहे. शिवाय बहुतांश पोलिस ठाण्यात नवे पोलिस निरीक्षक आलेले असल्यामुळे आपापल्या हद्दीत नियंत्रण मिळवण्यासाठी नवख्या अधिका-यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात नगर शहर, नगर ग्रामीण, गृह विभाग, कर्जत, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिका-यांची पदे आहेत. त्यापैकी गृह विभाग, कर्जत नगर शहर ही उपविभागीय अधिका-यांची पदे रिक्त आहेत. नगर शहराचा पदभार ग्रामीणचे उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे आहे. कर्जत उपविभागासाठी बदलून येत असलेले उपअधीक्षक मालवण दारुकांड प्रकरणात निलंबित झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. श्रीरामपूर उपविभागाचा पदभार राकेश ओला यांच्याकडे आहे. कोपरगाव उपविभागाचा पदभार विवेक पाटील यांच्याकडे आहे.

नगर शहर विभागाचे उपअधीक्षक यादवराव पाटील हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. शेवगाव उपविभागाचा पदभार बरेच महिने त्यांच्याकडेच होता. तेथे नवे उपअधीक्षक रुजू झाले आहेत. कर्जत उपविभागांतर्गत श्रीगोंदे, जामखेड कर्जत पोलिस ठाण्यांची जबाबदारी येते. या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महामार्गावर जबरी चो-या, दरोडे, इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रकार होतात. मात्र, अद्याप तेथे नवे पोलिस उपअधीक्षक नेमलेले नाहीत. संगमनेर उपविभागाची जबाबदारी सांभाळण्यासाठी उपअधीक्षक अजय देवरे हे नव्याने बदलून आले आहेत.

गृह विभागाचे उपअधीक्षकपद गेल्या वर्षापासून रिक्त झालेले आहे. गृह विभागासाठी गेल्या वर्षी एक उपअधीक्षक बढतीवर आले होते. परंतु, ते आठवडाभरातच सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पदही रिक्तच आहे. पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी गृह विभागाच्या उपअधीक्षकपदाची जबाबदारी सोपवलेली होती. नंतर त्यांची संगमनेरला बदली झाली. त्यामुळे तेव्हापासून मानवी तस्करी सेलचे पोलिस निरीक्षक शहाजी नरसोडे यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. कर्जत, नगर शहर गृह विभागाला उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी लाभले, तर कामाचा ताण हलका होईल.
फरार आरोपींचा शोध सुरूच
"मोक्का'लागलेल्या काही टोळ्यांचे मुख्य सूत्रधार असलेले जिल्ह्यातील खतरनाक गुन्हेगार अजूनही फरारच आहेत. जामखेड तालुक्यात झालेल्या शिवसेना तालुकाप्रमुख ठाणेकर यांच्या खूनप्रकरणातील दरोडेखोर टोळीचा मास्टरमाइंड रवी भोसले, शेवगावात पोलिस कर्मचा-याचा खून करणारा पिन्या कापसे हे दोघे अजूनही पोलिसांना गवसलेले नाहीत. ब-याचवेळा या दोघांपर्यंत पोहचूनही स्थानिक गुन्हे शाखेला त्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश आले आहे. या दोघांना अटक करणे, हा पोलिसांच्या इभ्रतीचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे नव्या उपविभागीय पोलिस अधिका-यांना या आरोपींना शोधण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

अनेक अधिकारी नवे
प्रशासकीयबदल्यांमुळे जिल्ह्यात बहुतांश अधिकारी नव्याने बदलून आले आहेत. तसेच बहुतांश पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीही नवे आहेत, तर काहींच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवस, तरी हद्दीचा अभ्यास करण्यात या अधिका-यांचा वेळ जाईल. आगामी काळात कुंभमेळा बंदोबस्तासाठी नगरचे पोलिस गेल्यानंतर पुन्हा मनुष्यबळाची अडचण असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...