आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपी गौतम यांना भोवली राजकारण्यांची नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरः वर्षपूर्ण होण्याच्या आतच जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांची अमरावती ग्रामीणला अनपेक्षित बदली झाल्यामुळे जिल्हावासीय चकीत झाले. गौतम यांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कसोशीने पावले उचलली. पोलिस दलालाही कडक शिस्त लावण्याचे प्रयत्न केले. पण वाळूतस्करी, अवैध व्यावसायिक यासारख्या बगलबच्चांवर कडक कारवाई केल्यामुळे काही राजकारणी दुखावले गेले. बऱ्याचदा राजकारण्यांनी पडद्याआड केलेल्या विनंत्याही त्यांनी धुडकावून लावल्या. अशा राजकारण्यांची नाराजीच गौतम यांच्या बदलीला कारणीभूत ठरली, अशी चरचा आहे.

पोलिस अधीक्षक गौतम अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांडाचा किचकट तपास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. जामखेड तालुक्यात झालेल्या ठाणेकर हत्या प्रकरणातील दरोडेखोरांची टोळी पकडली. विधानसभा निवडणुकीनंतर झालेली शिंगणापुरातील दंगल, रामनवमीला उसळलेली नगर शहरातील दंगल, वांबोरीतील युवकाची नग्न धिंड प्रकरण अशा तणावपूर्ण घटना त्यांनी कौशल्याने हाताळल्या. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखता आली.
अवैध वाळूतस्करीतून जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या फोफावल्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर गौतम यांनी त्यांच्या मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील वाळूतस्करी रोखण्यासाठी महसूल, पोलिस, आरटीओ, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा िवविध विभागांनी मास्टर प्लॅन तयार केला होता. पण वाळूतस्करांचा राजकीय वरदहस्त लक्षात घेता कारवाईस कोणीही पुढे आले नाही. अशा परिस्थितीत गौतम बलकवडेंच्या विशेष पथकांनी वाळूतस्करांवर कारवाया केल्या. वाळूतस्करांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी मोक्का कायद्याचा प्रभावीपणे वापर त्यांनी केला.

महामार्गांवरील जबरी चोऱ्या, दरोड्यांना आळा घालण्यासाठी, तसेच फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी गौतम यांनी विशेष मोहीम हाती घेतली. नगरसह इतर शहरांमध्ये अवैध मटका व्यवसायांवरही छापे टाकले. जेथे तडीपारी, हद्दपारी करण्यास पोलिस ठाण्यांना वर्षानुवर्षे लागतात, तेथे अल्पावधितच चार गुन्हेगारी टोळ्यांिवरुद्ध त्यांनी मोक्कानुसार कारवाई केली. शिंगणापूर शिर्डीच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन त्याचा पाठपुरावा केला.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाकाबंदी मोहिमेची अंमलबजावणी केली. परिणामी चेन स्नॅचिंग छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसला. महिला युवतींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक नेमले.

गौतम बलकवडे यांनी पोलिस दलालासुद्धा शिस्त लावली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन, दंडात्मक कारवाया केल्या. घरफोड्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शहरात रात्रीची गस्त वाढली. रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारे हॉटेल ढाबे अकरानंतर बंद होऊ लागले. त्यामुळे नाईटलाईफला आळा बसून गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. गुन्ह्यांची आकडेवारी वाढल्याचे दिसत असले, तरी तपासही योग्य पद्धतीने होऊ लागला. किरकोळ कारणासाठी चिरीमिरी घेण्याची कोणाची हिंमतही होत नव्हती. असे असूनही गौतम यांची बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वाळूमाफिया टार्गेट
नगरजिल्हा वाळूतस्करीकरिता कुप्रसिद्ध असून या धंद्यातून गुंडगिरी फोफावली आहे. राजकीय वरदहस्तामुळे वाळूतस्करांवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. पण लखमी गौतम यांनी वाळूतस्करांविरुद्ध अत्यंत कठोरपणे माेहीम राबवली. गेल्या महिन्यांत १५१ गुन्हे दाखल करुन ३३१ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या कारवायांमधून सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आधीच्या पोलिस अधीक्षकांच्या तुलनेत अल्पकाळातच पाचपटींनी ही कारवाई सरस ठरली.

प्रतिकूल परिस्थितीत झुंज
क्षेत्रफळानेराज्यात सर्वात मोठा असूनही नगर जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. पैकी उपअधीक्षकांची पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये वरिष्ठांना घटनास्थळी भेट द्यावी लागते. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांची दमछाक होते. याशिवाय जिल्ह्यातील वीस पोलिस निरीक्षकांनी जिल्ह्याबाहेर विनंती बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचा शेवटपर्यंत आटोकाट यशस्वी प्रयत्न केला.

आता कुठे गेल्या संघटना?
यापूर्वीपोलिस अधीक्षकांचा गुन्हेगारीवर वचक नसल्याची ओरड करत काही संघटनांनी आंदोलने केली. लखमी गौतम यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांचे स्वागतही केले. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी करणारे ठरावीक नेते कधीही चांगल्या कारवायांबद्दल एसपींचे कौतुक करण्यास पुढे आले नाहीत. यापूर्वी जिल्ह्यात चमकदार कामगिरी बजावलेले अधिकारी बदलून गेल्यानंतर त्यांची बदली रद्द करण्याची मागणी होत असे. पण, लखमी गौतम यांच्या बदलीचे एकाही संघटनेला सोयरसूतक नाही. यावरुन "बेसिक पोलिसिंग'चा "लखमी पॅटर्न' या जिल्ह्याला रुचला नाही, हे स्पष्ट आहे. अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी राहण्यापेक्षा त्याच्या बदलीसाठी आटापिटा करण्यात अाला, ही शोकांतिका आहे.
- यशवंत तोडमल, अध्यक्ष, स्माईलिंग अस्मिता.
बातम्या आणखी आहेत...