आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुधारगृहात दक्षतेसाठी हवेत पूर्णवेळ पोलिस, निरीक्षण गृहातील पळालेल्या मुलांचा तपास लागेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अमरधाम रस्त्यावर असलेल्या मुला-मुलींच्या बालसुधारगृहातून शनिवारी विधी संघर्षग्रस्त बालकांनी पलायन केले. या बालकांचा अद्यापही कोतवाली पोलिसांना अजूनही शोध लागलेला नाही. मात्र, या घटनेमुळे बालसुधारगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुधारगृहातील मुलांवर कडक निगराणी ठेवण्याकरिता येथे पूर्णवेळ पोलिसाची नेमणूक करावी, अशी सुधारगृहाच्या प्रशासनाची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सुधारगृह प्रशासनाच्या आगामी बैठकीत या मागणीचा पुनरुच्चार केला जाईल, असे अधीक्षीका सुवर्णा कुलकर्णी यांनी सांगितले.
सुधारगृहातून पलायन केलेल्या बालकांच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. याप्रकरणी बालसुधारगृहाच्या अधीक्षिका कुलकर्णी यांनी कोतवाली पाेलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शनिवारच्या घटनेच्या वेळी सुधारगृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक उपस्थित नसल्याचे दिसून आले होते.

बालसुधारगृहातील विधी संघर्षग्रस्त बालकांनी शनिवारी दुपारी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पलायन केले. पलायन करताना सुधारगृहातील काळजीवाहक बेरड यांच्यावर त्यांनी हल्लाही केला. काळजीवाहक बेरड यांनी आरडाओरडा करू नये म्हणून त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, बाल न्यायालयाच्या प्रतिनिधींनी रविवारी दुपारी सुधारगृहाची पाहणी केली.
पोलिसांनी केलेल्या पाहणीत बालकांनी कशा पद्धतीने पलायन केले, यावेळी बंदोबस्तावर कोण-कोण होते, याची सुधारगृहातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. अत्याचार अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अशा विविध गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या बालकांना या सुधारगृहात ठेवण्यात आलेले होते. नगर, श्रीगोंदे तालुक्यातील प्रत्येकी दोन, श्रीरामपूर तालुका बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा एकूण विधी संघर्षग्रस्त बालकांचा पलायन केलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिस कर्मचारी गरजेचाच
बालसुधारगृहात विधी संघर्षग्रस्त बालके ठेवली जातात. त्यांच्यावर निगराणी ठेवण्याकरिता चोवीस तास पोलिस बंदोबस्त असणे अपेक्षित आहे. पण, नगरच्या बालसुधार गृहात पोलिस नेमलेला नाही. त्यामुळे सर्व विधी संघर्षग्रस्त बालकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी काळजीवाहकावर येऊन पडलेली आहे. शनिवारचा प्रकार घडला त्यावेळी एक पोलिस तेथे नेमलेला होता. पण, दुपारची वेळ असल्यामुळे काळजीवाहकांना सांगून ते शेजारच्या खोलीत जेवायला बसलेले होते. नेमकी हीच संधी साधून बालकांनी पलायन करण्याचे धाडस केले.
वारंवार केली मागणी
- बालसुधारगृहातील बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्णवेळ पोलिस गरजेचे आहेत. सध्या खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका बालकाला सुधारगृहात ठेवलेले होते. त्यामुळे त्याच्यावर निगराणी ठेवण्याकरिता एक पोलिस उपलब्ध होता. पण, ते जेवायला बाजूच्या खोलीत बसल्याची संधी साधून बालकांनी पलायन केले. पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी बाल न्यायालयाचे प्रतिनिधींसोबत दर तिमाही बैठक होत असते. बैठकीत मागणी केलेली आहे. मात्र, पोलिस दिलेला नाही.''
सुवर्णा कुलकर्णी, अधीक्षिका, बालसुधारगृह.