आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांना पोलिस दलाचेच अभय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिक्षाचालकांशी पोलिसांचे ‘हितसंबंध’ वाढले आहेत. अनेक पोलिस त्यांच्याशी मित्रासारखे चौकात गप्पा मारताना दिसतात. त्यामुळे उघडपणे नियम मोडणाऱ्या चालकांकडे पोलिस कानाडोळा करतात. विशेष म्हणजे रस्त्यावर नागरीक हा प्रकार पहात असतात. त्यांनाही पोलिसांच्या या लाजिरवाण्या प्रकाराची चिड निर्माण होते. पण करणार काय? पोलिसांशी वाढत चाललेली मैत्री आणि किरकोळ दंड भरून सुटणारे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांशी बेशिस्तपणे वागत आहेत.
आरटीओ विभागातर्फे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील ५७४ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ५२ रिक्षाचालक दोषी आढळून आल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. तसेच दोषींकडून ६६ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, ३३ रिक्षाचालकांचे परवाने आणि लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्याचा कारभार सांभाळणारे आरटीओ कार्यालय रिक्षांवर कारवाई करण्यात खूपच मागे पडले असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. रिक्षाचालकाने दोन साथीदारांच्या मदतीने महिलेचा वनियभंग केल्याच्या घटनेनंतर अशा मुजोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांना चाप बसावा अन् त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी, या उद्देशाने ह्य ‘दिव्य मराठी’ने अभियान हाती घेतले आहे.
अवजड वाहनांवरच लक्ष
आरटीओ विभाग चारचाकी, ट्रक व अवजड वाहनांवरच कारवाई करण्यात मश्गूल आहे. या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात करताच मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होते. परिणामी, चिरीमिरी मिळण्यासही वाव मिळतो. त्यामुळे रिक्षांवर कारवाई करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
कशासाठी होतो दंड?
सिग्नल तोडल्यास, बिल्ला, गणवेश, लायसन्स नसणे, मोबाइलवर बोलणे, भररस्त्यावर वाहन उभे करणे, पुढच्या सीटवर किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवणे, अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना रिक्षा चालवणे या प्रकारच्या गुन्ह्यांत दंड करण्यात येतो.
शहर वाहतूक विभाग निमूटपणे पाहत शांतच
जळगाव शहरात ४३९० रिक्षांना अधिकृत परवाने आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा जास्त रिक्षा धावत असताना कारवाईचे प्रमाणही अत्यल्पच आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ५ हजार ३८१ रिक्षांवर कारवाई झाली आहे. महिन्याकाठी सरासरी ५०० रिक्षांवर कारवाई केली जाते. मात्र, बिल्ला, गणवेश व इतर नियम न पाळणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झालेले नाही. वचक निर्माण होईल, अशी कारवाई होत नाही.
रिक्षा संघटनेकडून निवेदन
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांवर कारवाई करावी, रेल्वेस्थानकावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, असे निवेदन श्रमजीवी कामगार ऑटोरिक्षा फेडरेशनतर्फे पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांना बुधवारी देण्यात आले. या वेळी अ‍ॅड.गोविंद तिवारी, जनार्दन कोळी, शेखर साळुंखे, बंटी कंडारे, दिलीप कोळी आदी उपस्थित होते.