आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीट मार्शलच्या गाड्यांचा खासगी कामांसाठी वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील पोलिस ठाण्यांना देण्यात आलेल्या बीट मार्शल मोटारसायकलींचा सर्रास खासगी कामांसाठी वापर करण्यात येत आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांकडूनही या मोटारसायकली वापरात येत आहेत. काही ठिकाणी जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दबाव टाकण्यासाठी या मोटारसायकली फिरताना आढळत आहेत.

नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कँप, एमआयडीसी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता तातडीने प्रतिसाद व गस्त घालण्यासाठी या मोटारसायकली देण्यात आल्या आहेत. झेब्रा पट्टे असलेल्या या गाड्या बीट मार्शल ड्युटी असलेल्या कर्मचार्‍यांकडे देणे अपेक्षित आहे. कोतवाली व तोफखाना या महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांना प्रत्येकी तीन मोटारसायकली देण्यात आल्या आहेत. शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक पाहता मोटारसायकल हे साधन जलद पोहोचण्यासाठी उपयोगाचे ठरते. त्यामुळे या गाड्यांना अधिक महत्त्व आहे. मात्र, सध्या मोटारसायकलींचा वेगळ्याच कामासाठी वापर सुरू आहे. पाल्यांना शाळेत नेऊन सोडण्यापासून ते गॅस टाकी घरापर्यंत पोहोच करण्यासारख्या घरगुती कामांसाठी कर्मचारी या मोटारसायकलीचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांकडूनच या मोटारसायकलींचा वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे. उपनगरामध्ये जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असताना या मोटारसायकली आढळून आल्या आहेत.

नगर शहराच्या हद्दीत चोर्‍या, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. नगरकरांसाठी अशा घटना रोजच्याच ठरत आहेत. गस्त वाढवून चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी बीट मार्शल नेमून नियमित गस्तीची आवश्यकता नागरिकांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे केलेली आहे. मात्र, नागरिकांच्या मागणीला पोलिस प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण पुढे करत बीट मार्शल नेमणेच काही पोलिस ठाण्यांनी बंद केले आहे. ज्या कामांसाठी या मोटारसायकली देण्यात आल्या आहेत, त्याच कामांसाठी वापर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.