आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Experts View On Maharashtra Assembly Election

लोकसभा निवडणुकीचा प्रभाव नाही जाणवणार; राजकीय विश्लेषक, अभ्यासकांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याने शिवसेना-भाजप युतीच्या पदरात मताचे दान भरभरून टाकले. मात्र, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल वेगळा असेल, असे चित्र सध्या दिसत आहे. एरवी गाफील राहणारे प्रस्थापित वाढत्या स्पर्धेने अधिक सावधपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे आपापले गडकिल्ले शाबूत ठेवण्यात त्यांना यश येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सपाटून पडले. दोन्ही मतदारसंघांत दोन लाख मतांच्या फरकाने आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदी लाट नसल्याचा दावा करणारे आघाडीचे नेते निकालानंतर जमिनीवर आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाच महिन्यांतच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. बदललेल्या परिस्थितीत सर्व मतदारसंघांत उमेदवार देताना सर्वच पक्षांना जवळपास पन्नास टक्के "आयात' उमेदवारांना संधी द्यावी लागली आहे. उमेदवारीची सोय झाल्याने दरवेळी जोमात असलेले बंडखोरीचे पीक यावेळी नगण्य ठरले. बंडखोरी पक्षांतर्गत विरोधकांकडून होणारे नुकसान यावेळी टळण्याची चिन्हे आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनीही एकाही मतदारसंघात फेरबदल घडवला नव्हता. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात जिल्ह्यातील त्या-त्या ठिकाणचे प्रस्थापित नेते वाकबगार आहेत. याचीच प्रचिती यावेळी येण्याची सर्वाधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. एखाद्या मोठे सभेने थोडेफार मतांमध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर लढवली गेली भाजपने पंतप्रधानपदासाठी दिलेला चेहरा आश्वासक वाटल्याने जिल्ह्यातील मतदारांनी युतीच्या उमेदवारांना मताधिक्य दिले.

आश्वासक चेहरा राष्ट्रीय प्रश्नांमुळे लोकसभा निवडणुकीत मोदी लाट जोरात होती. विधानसभा निवडणुकीत युती-आघाडी तुटल्याचा परिणाम जाणवणार आहे. ऐनवेळी पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांना, ते प्रस्थापित असले तरीही धक्के बसतील. उपऱ्या पक्ष बदलणाऱ्यांना यावेळी थारा मिळण्याची शक्यताही कमी दिसते आहे.” - डॉ.बाळ कांबळे, राज्यशास्त्र अभ्यासक.

'लोकसभेची लाट आता ओसरली आहे. युती आघाडी तुटली, तरी जिल्ह्यातील प्रस्थापितांची त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघावर घट्ट पकड आहे. त्यामुळे जिल्ह्यात विद्यमान आमदारांना मतदारांकडून प्रथम पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे. एकगठ्ठा मतदान इतिहासजमा होत असून नवमतदारांची भूमिकाही यावेळी महत्त्वाची ठरणार आहे.” - डॉ.गोपाळराव मिरीकर, राजकीय विश्लेषक.