आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Candidate Of NCP Congress Will Fill Form Today, Divya Marathi

आघाडीचे उमेदवार आज भरणार अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदमदगर - काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे राजीव राजळे व भाऊसाहेब वाकचौरे गुरुवारी (20 मार्च) अर्ज भरणार आहेत. भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी 25 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आघाडी व महायुतीचे मेळावेही गुरुवारी होत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता फेरी निघेल. दुपारी दोन वाजता राजळे व वाकचौरे यांचे अर्ज दाखल होतील. त्यानंतर सातभाई मळ्यातील मैदानावर संयुक्त प्रचारसभा होणार आहे. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी 25 ला अर्ज भरणार आहेत. महायुतीचा मेळावाही गुरुवारी सकाळी टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्यातून अंतर्गत वाद मिटल्याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न असून शिवसेना व भाजपचे पदाधिकारी, आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आम आदमी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद अजून नगरला फिरकल्या नाहीत. त्या गुरुवारी शहरात येण्याची शक्यता आहे. लोकशासन पक्षाकडून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी 21 ते 25 मार्चदरम्यान नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात संयुक्त प्रचारसभा होणार आहेत. या सभांना आघाडीचे तिन्ही मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहतील.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले प्रताप ढाकणे यांची नाराजी अजून दूर झालेली नाही. सध्या ते शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तत्पूर्वी पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत खासदार गांधी यांचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
उमेदवार आलेच नाहीत..
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीची ‘वारी विधानसभेची’ बस बुधवारी शहरात आली होती. आघाडी व महायुतीचे उमेदवार यानिमित्ताने समोरासमोर येण्याची शक्यता होती. मात्र, दोन्ही उमेदवार तिकडे फिरकलेच नाहीत. भाजपची बाजू आमदार राम शिंदे यांनी लावून धरली, तर राष्ट्रवादीच्या वतीने महापौर संग्राम जगताप व जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी किल्ला लढवला.
504 जणांवर कारवाई
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. आतापर्यंत 504 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 778 शस्त्र परवाने जमा झाले आहेत. मागील वेळी दक्षिणेत 17, तर उत्तरेत 6 ठिकाणे संवेदनशील होती. नवी यादी लवकरच तयार होईल. 50 जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव तयार आहेत, असे पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.