आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Dilip Gandhi News At Nagar, Divya Marathi

मोदींच्या टीमशी गैरवर्तन नडले, दिलीप गांधींना मंत्रिपद नाकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खासदार दिलीप गांधी यांचा समावेश होणार होता. मात्र, पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचे नाव ऐनवेळी पुढे आल्याने गांधींचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या पदरी निराशा पडली.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे गांधी यांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. तिस-यांदा खासदार झालेल्या गांधी यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी खुद्द गांधी व त्यांच्या समर्थकांना आशा होती. निवडणुकीच्या निकालानंतर दुस-याच दिवशी मंत्रिपदाची आस घेऊन गांधी दिल्लीला रवाना झाले होते. मंत्रिपदासाठी गेल्या दहा दिवसांपासून ते दिल्लीत तळ ठोकून बसले होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्या माध्यमातून गांधींनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत मंत्रिमंडळाच्या यादीत गांधी यांचे नाव होते. वृत्तवाहिन्यांवरही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, रात्री बारानंतर गांधी यांचे नाव मागे पडत पक्षाचे प्रवक्ते जावडेकर यांचे नाव पुढे आले.

सुरुवातीपासूनच गांधी यांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी होती. गांधी यांचा मतदारसंघातील कमी झालेला जनसंपर्क, नगर अर्बन बँक प्रकरण, खासदार निधीचा कमी वापर या तीन प्रमुख कारणांमुळे गांधी यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी घेतली होती. निवडणुकीत गांधींना गटबाजीचा फटका बसेल असा अंदाज होता. मात्र, मोदी लाटेमुळे तो फोल ठरला. मंत्रिपदात मात्र दुर्दैव आड आले. जावडेकर यांचे पुनर्वसन करण्यासाठी गांधींऐवजी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे गांधींना दिल्लीहून रिकाम्या हाताने परतावे लागले.

मोदींच्या टीमशी गैरवर्तन नडले
गांधी यांच्या प्रचारार्थ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये 12 एप्रिल रोजी जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी गुजरातहून मोदी यांची खास टीम नगरमध्ये आली होती. या टीमशी भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक पदाधिका-याने गैरवर्तन केले होते. संबंधितांनी या गैरवर्तनाची बाब मोदी यांच्या स्ट्रॉँग रूमला दिली होती, अशीही पक्षपातळीवर जोरदार चर्चा आहे.

... तर नगरमध्ये विकासकामे झाली असती
गांधींचा मंत्रिमंडळात समावेश झाला असता, तर केंद्रातून त्यांनी निधी आणून जिल्ह्याचा विकास साधला असता. सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती. पुढच्या वेळी त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल. त्यांच्या मंत्रिपदाचा राज्यालाही मोठा फायदा झाला असता.’’
अनिल गट्टाणी, उपाध्यक्ष, भाजप