आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Election Issue At Nagar, Divya Marathi

आघाडी उतरली प्रचारात; शिवसेना मात्र संभ्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आता महापालिकेचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवकही उतरले आहेत. आघाडीच्या नगरसेवकांची नुकतीच वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत सर्व नगरसेवकांना प्रभागनिहाय प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचाराला शहरात गती मिळणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक मात्र प्रचाराबाबत अजूनही संभ्रमात आहेत.
डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले. निवडणुकीत पक्षाचे 18 नगरसेवक निवडून आले, शिवाय मनसे व अपक्ष नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

काँग्रेसच्या 11 नगरसेवकांसह राष्ट्रवादीने मनपात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शहरातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यात नगर लोकसभा मतदारसंघातून राजीव राजळे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. राजळेंच्या प्रचारासाठी आघाडीचे शहरातील पदाधिकारी एकदिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराची रणधुमाळीच्या ज्वर आता सुरू झाला आहे. शहरातील आघाडीच्या सर्व नगरसेवकांना प्रचाराची जबाबदारी देण्यासाठी मंगळवारी (25 मार्च) राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. बैठकीला आमदार बबनराव पाचपुते, महापौर संग्राम जगताप, दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा या पदाधिकार्‍यांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. राजळेंच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला प्रभागनिहाय प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली.

प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करणे, तसेच प्रभागात ठिकठिकाणी ‘कॉर्नर मीटिंग’ घेऊन नागरिकांना पक्षाची ध्येय-धोरणे समजावून सांगण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या. शिवाय एकजुटीने पक्षाचे काम करून राजळे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही पदाधिकार्‍यांनी सांगितले. या बैठकीमुळे आघाडीच्या नगरसेवकांना प्रचाराची दिशा मिळाली आहे. काही नगरसेवकांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवातही केली. त्यामुळे राजळे यांना या नगरसेवकांची मोठी मदत होणार आहे.

एकीकडे आघाडीचे नगरसेवक प्रचारात उतरले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक मात्र, प्रचाराबाबत संभ्रमात आहेत. शिवसेना आमदार अनिल राठोड व महायुतीचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्यात मनपा निवडणुकीपासून शीतयुद्ध सुरू आहे. आपण महायुतीचा प्रचार करणार आहे, उमेदवाराच्या प्रचाराबाबत मात्र योग्य वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका राठोड यांनी घेतली होती.

दरम्यान, मंगळवारी (25 मार्च) झालेल्या गांधी यांच्या प्रचारसभेला राठोड यांनी हजेरी लावल्याने दोघांमधील शीतयुद्ध संपुष्टात आल्याची चर्चा आहे. असे असले तरी राठोड यांनी गांधी यांच्या प्रचाराबाबत नगरसेवकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक अजूनही गांधी यांच्या प्रचारात सक्रिय झालेले नाहीत.

दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल
शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रचाराबाबत अजून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. येत्या दोन दिवसांत त्याबाबत बैठक होणार आहे. मात्र, आमदार राठोड यांनी गांधी यांच्या प्रचारसभेला हजेरी लावल्याने शिवसेना नगरसेवकांमधील संभ्रम दूर झाला असल्याचेही या नगरसेवकाने सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक कामाला लागले
राष्ट्रवादी भवनात वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. राजळे यांच्या प्रचाराबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकाला प्रभागनिहाय प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. सर्व नगरसेवक कामाला लागले आहेत.’’ समद खान, गटनेता, राष्ट्रवादी.