आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Gandhi, Rajale And Wakchoure's Growth In Wealth Issue, Divya Marathi

गांधी, राजळे व वाकचौरेंच्या संपत्तीत चार ते बारापट वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार राजीव राजळे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत भरघोस वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत गांधी दाम्पत्यांची संपत्ती बारापटीने, राजळे दाम्पत्याची दहापटीने, तर वाकचौरे दाम्पत्याच्या संपत्तीत चारपटीने वाढ झाली आहे. लोकसभेच्या 2009 व 2014 निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.
सन 2009 मध्ये गांधी हे भाजपच्या, तर राजळे अपक्ष म्हणून नगर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात होते, तर शिर्डी लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली. उमेदवारी अर्ज भरताना कुटुंबीयांची संपत्ती प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2009 व 2014 मध्ये या तिन्ही उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.
भाजपचे उमेदवार खासदार गांधी यांनी त्यांचा व्यवसाय समाजसेवा दाखवला असून त्यांच्या पत्नी सरोज गांधी गृहिणी असून त्या व्यापार करत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. 2009 मध्ये गांधी दाम्पत्याकडे 9 लाख 54 हजार 140 रोकड होते. 20 लाख 20 हजार 546 रुपयांची जंगम व 23 लाख 43 हजार 140 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. गेल्या पाच वर्षांत गांधी दाम्पत्याच्या संपत्तीत तब्बल बारापटीने वाढ झाली. 2014 मध्ये गांधी दाम्पत्याकडे 7 लाख 40 हजार 400 रोकड, 1 कोटी 36 लाख 1 हजार 725 रुपयांची जंगम व 5 कोटी 17 लाख 15 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. गांधी यांच्यावर 4 लाख 76 हजार, तर त्यांच्या पत्नी सरोज यांच्यावर 3 कोटी 37 लाखांचे कर्ज असल्याचे दर्शवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजळे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या एकत्रित मालमत्तेत 2009 च्या तुलनेत दहापटीने वाढ झाली आहे. 2009 च्या निवडणुकीत राजळे दाम्पत्याकडे 1 लाख 95 हजार रोकड, 19 लाख 72 हजार 127 रुपयांची जंगम, तर 43 लाख 17 हजार 400 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. 2014 मध्ये त्यांच्याकडे 4 लाख 10 हजार रोकड, 96 लाख 35 हजार 350 रुपयांची जंगम व 5 कोटी 26 लाख 14 हजार 510 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2009 मध्ये त्यांच्यावर 20 लाख 24 हजार 409, तर 2014 मध्ये 1 कोटी 71 लाख 539 रुपयांचे कर्ज आहे. राजळे दाम्पत्याने त्यांचा व्यवसाय शेती असल्याचे दर्शवले आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून निवृत्त झालेले काँग्रेसचे शिर्डीतील उमेदवार वाकचौरे व त्यांच्या पत्‍नी सरस्वती वाकचौरे यांची एकत्रित संपत्ती चारपटीने वाढली आहे. सन 2009 मध्ये वाकचौरे दाम्पत्याकडे 11 लाख 15 हजार 965 रोकड, 83 लाख 22 हजार 332 रुपयांची जंगम मालमत्ता व 85 लाख 22 हजार 188 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. 2014 मध्ये त्यांच्याकडे 4 लाख 71 हजार 761 रोकड, 2 कोटी 17 लाख 13 हजार 329 रुपयांची जंगम व 4 कोटी 36 लाख 88 हजार 807 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2009 मध्ये त्यांच्यावर 85 लाख 22 हजार 188 कर्ज होते. सध्या त्यांच्यावर 6 लाख 43 हजार 1 रुपयांचे कर्ज आहे.
अशी आहे उमेदवारांची संपत्ती
उमेदवार 2009 2014 वाढ (पटीत)
दिलीप गांधी 53,17,826 6,60,57,125 12
राजीव राजळे 64,84,527 6,26,59,860 10
भाऊसाहेब वाकचौरे 1,79,60,485 6,58,73,897 04
सदाशिव लोखंडे, योगेश घोलप, दीपाली सय्यद कोट्यधीश
आम आदमी पक्षाच्या उमेदवार सोफिया (दीपाली) सय्यद व त्यांचे पती जहांगीर सय्यद यांच्याकडे 3 कोटी 2 लाख 35 हजार रुपयांची मालमत्ता आहे. शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याकडे 3 कोटी 27 लाख 58 हजार रुपयांची मालमत्ता आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या तिन्ही मुलांकडे जवळपास 56 लाख रुपयांची मालमत्ता आहे. माजीमंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश यांनीही शिर्डीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याकडे 13 कोटी 56 लाखांची मालमत्ता आहे.
कोळसे सर्वांत श्रीमंत उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे हे नगर जिल्ह्यात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहेत. कोळसे व त्यांच्या पत्नी मालती कोळसे यांच्याकडे 33 कोटी 80 लाख 26 हजार 202 रुपयांची संपत्ती आहे. 8 लाख 66 हजार रुपयांची रोकड, 3 कोटी 61 लाख 59 हजार रुपयांची जंगम, तर 27 कोटी 10 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता कोळसे दाम्पत्याकडे आहे. कोळसे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, अधिकार्‍याला हुसकावून लावणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, असे तीन गुन्हे दाखल आहेत.