नगर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत. म्हणूनच एकीकडे सत्तेत राहून ते मित्रपक्षाला चिमटेही काढतात आणि दुसरीकडे भाजपचे कौतुकही करतात. इतर पक्षांबरोबर गद्दारी करणार्या उमेदवारांना बक्षीस देण्याची, तर त्यांची आणि काँग्रेसची परंपराच आहे. यंदाही ही परंपरा कायम ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादीने गद्दारांना उमेदवारीची बक्षिसी दिली, असा सणसणीत आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कांगो यांनी सत्ताधार्यांवर हल्ला चढवला.
लोकशासन पक्षासह समविचारी पक्षांच्या परिवर्तन (तिसर्या) आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी गांधी मैदानात प्रचारसभा झाली. यावेळी कानगो बोलत होते. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, शिवराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर, कामगार नेते अनंत लोखंडे, भाकप नेते अँड. सुधीर टोकेकर उपस्थित होते.
कांगो म्हणाले, उद्योगपती व भांडवलदारांमार्फत केंद्रातले सरकार चालवले जाते. देशाचा पंतप्रधान व इतर मंत्रीही हेच लोक ठरवतात. म्हणूनच देशाचे वाटोळे होत आहे. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असून कोणाची कितीही लाट असली, तरी डाव्या आघाडीच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. गरीब, सामान्य नागरिक व शेतकर्यांच्या हितासाठी कोळसे यांना मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजप व काँग्रेस भांडवलदारांचे बटीक आहेत. त्यांना शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या प्रo्नांचे घेणे-देणे नाही. ए. राजा या मंत्र्याने घोटाळा केला, पण मोदींनी त्याच्याविरुद्ध उमेदवार उभा केला नाही. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे मणिशंकर अय्यर, जयपाल रेड्डी यांनाही काँग्रेस सरकारने भांडवलदारांच्या सांगण्यावरून घरी पाठवले. एकीकडे हे गैरव्यवहार उघड होत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष मूग गिळून गप्प बसले आहेत, असे कानगो म्हणाले.
देशात शहाणपणाचा दुष्काळ
आपल्या देशात शहाणपणाचा मोठा दुष्काळ आहे. मात्र, आता सत्ताधार्यांची आणि विरोधकांची मस्ती उतरवण्यासाठी आपला लढा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकांनी निवडून दिलेले खासदार भांडवलदारांच्या सोयीचे कायदे करत आहेत. भविष्यातील अर्थकारण, समाजकारण कोणाच्या हातात असावे हे ठरवणारी निवडणूक यंदा होत आहे. त्यामुळे ती कोणत्याही एका पक्षाची निवडणूक नाही, असे कांगो यावेळी म्हणाले.
तुम्हाला ‘चॉईस’ नाही?
जनतेने निवडून दिलेले खासदार देशाचा कारभार करत नाहीत. ते सर्व विकले जातात. भांडवलदारांना हवे तसे कायदे होत असल्यामुळे देशाचा कारभार भांडवलदारच करत आहेत, असा आरोप माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केला. भांडवलदारांनी काँग्रेसचे चिपाड करून टाकले आणि आता भाजपला हाताशी धरले आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला ‘चॉईस’ ठेवला नव्हता, पण आता कोळसेंच्या रूपात चांगला ‘चॉईस’ आहे, असे ते म्हणाले.