आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणुकीचे "काउंटडाऊन' सुरू, येत्या २१ जूनला होणार महापौर निवडीचा फैसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. येत्या २१ जूनला महापौर निवडीचा निर्णय होणार आहे. त्यासाठी शिवसेना-भाजपची तयारी पूर्ण झाली अाहे. काँग्रेस आघाडीत मात्र अद्याप शांतताच आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते मागील तीन-चार महिन्यांपासून तयारीला लागले होते. त्यामुळे अडीच वर्षानंतर महापालिकेवर पुन्हा युतीचा भगवा फडकण्याची शक्यता अधिक आहे.

राष्ट्रवादीचे महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ ३० जूनला पूर्ण होत आहे. त्यापूर्वी नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होणार आहे. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीची रंगीत तालीम तीन-चार महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीतच पहायला मिळाली. शिवसेनेने पोटनिवडणुकीत यश िमळवत महापौर निवडणुकीची गणितं आखली. शिवसेना नेत्यांना त्यात यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी लागणारे अपेक्षित ३५ संख्याबळ शिवसेना- भाजपने कधीच पूर्ण केले आहे. आघाडीतील तीन बंडखोर मनसेच्या दोन नगरसेविकांना त्यांनी सहज आपल्या गोटात ओढले.

काँग्रेस आघाडीने मात्र सुरुवातीपासूनच ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला आपले फासे फेकण्यात काहीच अडचण आली नाही. राष्ट्रवादीने जणू काही शिवसेनेसाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महापौरपदाची उमेदवारी काँग्रेसला की, राष्ट्रवादीला याचा घोळ आघाडीत सुरुवातीपासून सुरू होता. तो अजूनही संपलेला नाही. आघाडीचा एकही नेता त्याबाबत बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपचा भगवा महापालिकेवर फडकेल. यावर २१ जूनला शिक्कामोर्तब होण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याची चर्चा आहे.

महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही आघाडीत सामसूम अाहे. शिवसेना-भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केल्यास राज्यात महापालिकेत युतीची सत्ता प्रथमच पहायला मिळेल. त्याचा फायदा शहर विकासासाठी होणार आहे. शिवसेनेचे वरच्या फळीतील स्थानिक पदाधिकारी नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांची ही तयारी फळास येण्यासाठी अवघे पंधरा दिवस उरले आहेत. निवडणुकीचे काउंंटडाऊन सुरू झाले असून पंधरा दिवसांत आघाडीच्या नेत्यांनी काही सूत्रे हलवली, तर मात्र शिवसेनेच्या अडचणी वाढतील.

भाजपच्या उमेदवारीचा तिढा कायम
शिवसेनेच्यावतीने महापौरपदासाठी शहरप्रमुख संभाजी कदम यांची पत्नी सुरेखा कदम यांची उमेवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजचा उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा घोळ मात्र अद्याप संपलेला नाही. सुरुवातीला खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध केला. उपनगरातील नगरसेवकालाच उपमहापौरपद मिळाले पाहिजे, अशी मागणी पुढे आली आहे. उपमहापौरपदासाठी स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे, उषा नलावडे, मनीषा बारस्कर आदींची नावे चर्चेत आहेत.

कोतकरांचा महासभेत निर्णय
महापौर अभिषेक कळमकर यांनी १४ जूनला महासभा बोलावली आहे. त्यात अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संदीप कोतकर यांच्या नगरसेवक पदाबाबत निर्णय होणार आहे. नगरसेवकपद रद्द करायचे की नाही, याबाबत महापालिका आयुक्तांनी कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे. त्याचा अहवाल सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कोतकर यांच्याबाबत निर्णय होईल.
बातम्या आणखी आहेत...