नगर- हृदयाचे ठोके वाढवणारे संगीत, कर्णकर्कश डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अन् मद्यधुंद कार्यकर्ते, तासनतास रेंगाळलेली मिरवणूक, राजकीय घोषणाबाजी अशा "पारंपरिक' वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळांनी सोमवारी बाप्पाला निरोप दिला. आमदार अनिल राठोड व महापौर संग्राम जगताप सहभागी झालेल्या मंडळांच्या मिरवणुकीत जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले गेले. रेंगाळलेल्या मिरवणुकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनीच चुकीचे नियोजन केल्याचे खापर आमदार व महापौरांनी त्यांच्यावर फोडले. त्यामुळे मिरवणुकीला गालबोट लागले. दरम्यान, डीजेंच्या कर्णकर्कश आवाजाबद्दल पोलिसांनी मंगळवारी चार मंडळांवर गुन्हे नोंदवले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या श्रीविशाल गणेशाची पूजा करण्यात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. नगरच्या युवक व युवतींनी स्थापन केलेले ढोल-ताशे पथक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
१४ मंडळांचा सहभाग
यंदा मिरवणुकीत १४ मंडळे सहभागी झाली. विशाल गणेश मंडळ अग्रभागी होते. त्यापाठोपाठ संगम मित्रमंडळ, माळीवाडा गणेश मंडळ, आदिनाथ मित्रमंडळ, गणेश मित्रमंडळ, नवजवान मित्रमंडळ, महालक्ष्मी गणेश मंडळ, कपिलेश्वर मित्रमंडळ, नवरत्न मित्रमंडळ, समझोता मित्रमंडळ, नीलकमल मित्रमंडळ, शिवशंकर मित्रमंडळ, शितळादेवी प्रतिष्ठान व आनंद प्रतिष्ठान ही मंडळे होती. सायंकाळी ५ नंतर तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. नवरत्न, समझोता व शितळादेवी प्रतिष्ठानच्या मंडळांचा अपवाद वगळता इतर ११ मंडळांनी पारंपरिक तालवाद्यांवर मिरवणूक काढली. नवरत्न मंडळात अविनाश घुले, समझोता मंडळात शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी, शिवशंकर मंडळात महापौर संग्राम जगताप व जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, तर शितळादेवी मंडळात नगरसेवक विक्रम राठोडव आमदार अनिल राठोड यांनी सहभाग घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी ही मिरवणूक प्रतिष्ठेची होती. त्यामुळे राजकीय नेत्यांचा प्रभाव असलेल्या मंडळांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
रांगोळ्यांनी स्वागत
बंगाल चौकी, भिंगारवाला चौक, नगर अर्बन चौक, नवीपेठ याठिकाणी नागरिकांनी विशाल गणपती रथाचे स्वागत केले. चौकांत महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. नेता सुभाष चौकात आमदार राठोड यांनी विशाल गणेशाच्या रथाचे स्वागत केले. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सहभागी झालेले नगरी ढोल-ताशा व हलगी पथक सर्वांचेच आकर्षण ठरले. गाडगे महाराज आश्रमशाळेचे लेझीम व झांज पथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी दांडपट्टा, तलवारबाजी, तसेच हवेत काठी फिरवून कला सादर केली. सकाळी साडेनऊ वाजता निघालेली विसर्जन मिरवणूक सायंकाळी पावणे ७ वाजता दिल्ली दरवाजात आल्यावर भाविकांनी गुलालाची उधळण व गणरायाचा जयघोष केला.
तीन मंडळांचा डीजेचा दणदणाट
मिरवणुकीत ११ मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. आमदार अरुण जगताप व महापौर जगताप समर्थक शिवशंकर मंडळात ढोलपथक होते. शहरप्रमुख संभाजी कदम यांचे शहर शिवसेना, अविनाश घुले यांचे नवरत्न व शिवाजी कदम यांच्या समझोता मंडळात डीजे होता. ही मंडळे राजकीय व्यक्तींशी निगडित असल्यामुळे डीजेच्या आवाजावर निर्बंध नव्हते. धोकादायक इमारतींच्या परिसरातही ध्वनिमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मिरवणूक मार्ग दणाणून निघाला.
राजकीय घोषणाबाजीमुळे तणाव
महापौर जगताप समर्थक शिवशंकर मंडळाची विसर्जन मिरवणूक या वेळी शिवसेनेच्या मंडळाच्या पुढे होती. शिवशंकर मंडळाने कापड बाजार ते नव्या पेठेपर्यंत यायला तब्बल तीन-साडेतीन तास लावले. त्यामुळे अर्बन बँक चौक व नवी पेठ रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. चेंगराचेंगरी झाल्यामुळे पोलिसांनी रथ पुढे घ्यायला सांगितले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. पोलिस अधीक्षक लखमी गौतम व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वत: हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; पण महापौरांच्या समर्थकांनी राजकीय घोषणाबाजी केली.
डीजेमालकांवर होणार कारवाई
पोलिसांनी चार मंडळांच्या अध्यक्ष व डीजेमालकांच्या विरोधात गुन्हे नोंदवले. शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम (शहर शिवसेना मंडळ) व शिवाजी कदम (समझोता मंडळ) यांच्याविरुद्ध कोतवालीत, तर तोफखाना ठाण्यात मंगेश अरुण थोरात व विकास विलास भापकर (दोस्ती तरुण मंडळ) आणि जालिंदर सुरेश शिंदे व सचिन भानुदास अकोलकर (गोरक्षनाथ मंडळ) यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
ड्राय डे चा नियम धाब्यावर
आता माझी सटकली, बेबी डॉल सोने दी, मै हूँ डॉन, शिट्टी वाजली, लुंगी डान्स, पप्पी दे पारूला यासह शिवसेनेचे प्रचारगीत व इतर गाण्यांनी विसर्जन मिरवणूक अक्षरश: दणाणून निघाली. अश्लील गाण्यांवर तरुणांनी व कार्यकत्यांनी मद्यधुंद अवस्थेत हिडीस हावभाव करत ताल धरला होता. ह्यड्राय डेह्ण असला, तरी भक्तांसाठी सर्व "व्यवस्था' केलेली होती. अनेकांनी नशेतच गणरायाला निरोपाला दिला. किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही घडले. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला, पण राजकीय नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मिरवणूक सोडून महापौर निघून गेले...
महापौर जगताप व आमदार राठोड यांनी पोलिसांच्या नियोजनाचा खरपूस समाचार घेतला. जगताप यांनी पोलिसांवर टीका करत पावणेबारा वाजता मिरवणूक सोडून निघून जाणे पसंत केले, तर आमदार राठोड यांनी मिरवणूक संपताच जाहीर भाषण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. मिरवणूक संपताच आमदार राठोड यांनी पत्रकारांना बाइट दिले. त्यांनीही पोलिसांवरच तोंडसुख घेतले. पोलिसांनी मिरवणुकीचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप त्यांनी केला. नाव न घेता महापौर जगताप यांच्यावरही त्यांनी टीकेची तोफ डागली.