आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांमधील बेबनावामुळे काँग्रेसच्या दौ-याचा फज्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - काँग्रेसच्या तालुक्यातील नेत्यांनी सुरू केलेल्या तालुकास्तरीय दौ-याचा अंतर्गत बेबनाव व आपसातील कुरघोडी, तसेच अल्प प्रतिसादामुळे पूर्णत: फज्जा उडाला आहे.

माजी आमदार शिवाजीराव नागवडेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्रीगोंदे विधानसभा विकास आघाडीच्या माध्यमातून हा दौरा सुरू झाला होता. प्रत्यक्षात त्यात फक्त काँग्रेसची नेतेमंडळी सहभागी झाली. कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप व त्यांचे पुत्र राहुल जगताप, तसेच जगताप समर्थक सर्व प्रमुख पदाधिकारी या दौ-यापासून चार हात दूर राहिले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तुळात असणारे युवक नेते हेमंत ओगले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर, सभापती मीना देवीकर यांनी दौ-यात कोठेही सहभाग घेतला नाही. महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली बोरुडे यांचे निमंत्रणपत्रिकेत नाव नसल्याने त्या देखील रुसून बसल्या होत्या.

श्रीगोंदे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दौरा चालू असताना स्वतंत्रपणे लोणी व्यंकनाथ येथे मेळावा घेतला. शिवाजीराव नागवडेंच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांनी महिलांची सहल काढून सवतासुभा मांडला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर हेच एकमेव नेते सलग आठ दिवस या दौ-यात सहभागी होते. अन्य नेत्यांनी मधूनच काढता पाय घेतला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनसिंग भोयटे यांनीही दौ-यातून मधूनच गायब होणे पसंत केले.

शिवाजीराव नागवडे यांच्यासह बाळासाहेब नाहाटा, प्रा. दरेकर, बाळासाहेब गिरमकर, कैलास पाचपुते, अण्णासाहेब शेलार, डी. एम. भालेराव या नेत्यांना दौ-यामध्ये जागोजागी कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले.

‘तुमचे ऐक्य किती दिवस राहणार? आम्ही केव्हापर्यंत संघर्ष करायचा? निवडणूक संपली की पुन्हा कोणी भेटत देखील नाही’ असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी जागोजागी विचारले. आठ दिवसांच्या या दौ-याची रविवारी सांगता झाली. दौ-याचे फलित काय याविषयी कार्यकर्त्यांमध्ये देखील कुजबुज ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या दौ-यावरून श्रीगोंदे तालुक्यातील काँग्रेस नेत्यांतील कुरघोड्यांचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले.

दौ-याचा हेतू सफल
४काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे केलेल्या तालुकास्तरीय दौ-याचा मूळ हेतू साध्य झाला आहे. हा दौरा म्हणजे शक्तीप्रदर्शन नव्हते, तर कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न होता. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, माळढोक पीडितांचे प्रश्न आदींमुळे तालुक्यात एक सार्वत्रिक नैराश्य जनतेत असल्याचे दिसले. सत्तारुढ आमदार बबनराव पाचपुते यांच्याविषयी नाराजी प्रामुख्याने समोर आली. या अर्थाने दौ-याचा हेतू सफल झाला.’’ प्रा. तुकाराम दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस.