आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडी आदेशावरच "कृषी'चा कारभार, भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या नियुक्तीचा वाद चिघळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांच्या तोंडी आदेशावरून भाऊसाहेब बऱ्हाटे हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर विराजमान झाल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून पुढे आले. या पदावर कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्याचे लेखी आदेश स्वत: कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असतानाही राज्यमंत्री शिंदे यांनी बऱ्हाटे यांच्याकडे पदभार सोपवण्याचे तोंडी आदेश दिले. कॅबिनेट मंत्र्यांचे आदेश डावलून राज्यमंत्र्याने तोंडी आदेशाद्वारे केलेल्या नियुक्तीमागे काय गौडबंगाल आहे, अशी चर्चा कृषी विभागात आहे. यासंदर्भात कृषिमंत्री या विभागाच्या सचिवांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम तसेच कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या विभागात कृषी अधीक्षक कृषी अधिकारी हे प्रमुख पद आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांची बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या रिक्त जागेवर अकोला येथून आर. बी. गोसावी यांची बदली करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर गोसावी दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर या पदावर कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड यांना अधीक्षक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्याचे लेखी आदेश कृषिमंत्री खडसे यांनी १० मार्चला काढले. परंतु, विभागीय सहसंचालकांनी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. दरम्यान, विद्यमान प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी कृषी सहसंचालकाना १६ मार्चला पदभार स्वीकारण्यासंदर्भात कार्यालयीन पत्र दिले. या पत्रात कृषिमंत्री खडसे यांच्या पत्राचा संदर्भ देऊन गायकवाड यांना पदभार देण्याचे मान्य केले. तथापि पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर (तोंडी) झालेल्या चर्चेचा संदर्भ देण्यात आला. या चर्चेनुसार पदाचा भार प्रकल्प संचालक आत्मा यांनी घ्यावा, असे तोंडी आदेश दिले. त्यानुसार कृषी आयुक्तांशी दूरध्वनीवर झालेली चर्चा त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार (तोंडी) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार समकक्ष अधिकारी या नात्याने स्वीकृत केल्याचे विभागीय सहसंचालकांना बऱ्हाटे यांनी कळवले.

कृषी उपसंचालक गायकवाड यांना कोणत्याही परिस्थितीत हा कार्यभार मिळू नये, यासाठी मंत्री शिंदे अधिकारी बऱ्हाटे यांचा आटापीटा सुरू असल्याची चर्चा कृषी विभागात सुरू आहे. एकीकडे शेतकरी सलग दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मेटाकुटीला आला असताना कृषी विभागात चाललेल्या तोंडी आदेशावरील कारभार अचंबित करणारा ठरत आहे.
प्रशासकीय कामकाज तोंडी आदेशावर नव्हे, तर लेखी आदेशावर चालतो. परंतु, तोंडी आदेश असले, तरी मंत्र्याने दिले आहेत, असे रेटून नेण्याची सारवासारव सध्या सुरू आहे.
याप्रकरणी शिवनेरी युवा प्रतिष्ठानचे भाऊसाहेब तापकिरे यांनी ११ एप्रिल रोजी थेट कृषिमंत्री खडसे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यात बऱ्हाटे यांनी वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे म्हटले अाहे. याप्रकरणाची चौकशी करून बऱ्हाटे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यातून पदभाराचे रंगलेले नाट्य चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोसावी यांनी पदभार स्वीकारताच दीर्घ रजेवर जाण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मंत्र्यांचे आदेश आहेत
कृषिमंत्रीएकनाथखडसे यांच्या आदेशानुसारच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्याकडे सोपवला आहे. आदेश तोंडी असले, तरी ते मंत्र्यांचे आहेत. तसेच बऱ्हाटे यांच्याकडे प्रभारी पद आहे. त्यामुळे या जागी बऱ्हाटे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.'' राम शिंदे, कृषीराज्यमंत्री तथा पालकमंत्री.

राज्यमंत्र्यांकडे जबाबदारी
नगरयेथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार देण्यासाठी १० मार्चला या पदावर या कार्यालयातील उपसंचालक (कृषी) आर. के. गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे लेखी आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिले. मंत्री शिंदे यांच्याकडे कृषी राज्यमंत्रिपद असल्याने नियुक्तीबाबत त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली.'' एकनाथ खडसे, कृषिमंत्री.

कृषी उपसंचालक गायकवाड यांनी यापूर्वी सांभाळला पदभार
तत्कालीनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने हे एका शासकीय विदेश दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळी या पदाचा पदभार कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. परंतु, आता पालकमंत्री शिंदे यांच्या तोंडी आदेशानुसार आत्माचे प्रकल्प संचालक बऱ्हाटे यांना पदभार देण्यात आला. तसेच कृषिमंत्री खडसे यांच्या लेखी आदेशानंतरही कृषिराज्यमंत्री शिंदे यांनी बऱ्हाटे यांच्याकडेच पदभार का सोपवला, याचे कोडे सुटायला तयार नाही.
बातम्या आणखी आहेत...