आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यावरून नेत्यांत वादविवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - घोड व कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावरून श्रीगोंद्यातील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेत्यांच्या या जुगलबंदीमुळे सामान्यांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

घोड व कुकडीतील धरणांच्या पाणीवाटपात पुणे जिल्ह्याची नगर जिल्ह्यावर कायम दादागिरी असल्याचा आरोप तालुक्यातून होत असतो. दुष्काळ असताना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून श्रीगोंदे तालुक्याला संघर्ष करावा लागला. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे घोड व कुकडी प्रकल्पातील येडगाव, डिंभे, वडज ही मुख्य धरणे भरली. पिंपळगाव जोगा व माणिकडोह ही धरणे 75 टक्के भरली.

घोड धरणाचे जलपूजन करण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. सर्वप्रथम काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य अनुराधा नागवडे, त्यानंतर साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते व आमदार बबनराव पाचपुते यांनी जलपूजन केले. जलपूजनाची नेत्यांमध्ये स्पर्धा लागली असताना माजी जि. प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी नागवडे, पाचपुतेंवर पाण्याचे र्शेय लाटत असल्याचा आरोप केला. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनीही विसापूर तलावाचा कुकडीत समावेश होऊ शकत नाही, म्हणून टीका केली. कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनीही पाचपुतेंवर पाणीप्रश्नी शरसंधान साधले.

पुणेकरांनी आपली दादागिरी थांबवावी
घोड व कुकडी प्रकल्पासाठी समान पाणीवाटप व्हावे. पाणीप्रश्नावर पुणे जिल्ह्याची दादागिरी सहन करणार नाही. घोड व कुकडीवरील 72 केटी वेअरमुळे उन्हाळ्यातही पुणेकरांना पाणी मिळते. धरणात पुणेकरांच्या जमिनी गेल्या हे खरे आहे. त्याचा मोबदलाही मिळाला आहे, हे विसरू नये. ‘घोड’ची उंची दोन मीटरने वाढवली, तर उन्हाळ्यात एक रोटेशन वाढेल. मंत्री असताना बैठकांमध्ये पाण्यावर भांडत होतो. आता मात्र, उघडपणे भांडण करू.’’ बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदे.

मंत्रिपद गेल्यानंतर पाचपुतेंना साक्षात्कार
श्रीगोंदे तालुक्यावर पुण्यातील नेते पाणीप्रश्नी अन्याय करतात, असे आम्ही वारंवार म्हणत होतो. तेव्हाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते तालुक्याने जादा पाणी वापरल्याचे प्रत्युत्तर देत. आता ते पुणे जिल्ह्यावर टीका करतात. मंत्रिपद जाताच त्यांना पाणीप्रश्नी अन्याय झाल्याचा साक्षात्कार कसा झाला? कुकडी नदीवर 72 केटीवेअर झाले. ते कोणाच्या काळात, अन् तेव्हा पाचपुते गप्प का होते? पुण्याशी ते खरोखरच दोन हात करणार असतील, तर त्यांना पाठिंबा राहील.’’ कुंडलिक जगताप, कुकडी कारखाना.