आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Wrong To See It As A Business Prshant Herai

राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहणे चुकीचे - प्रशांत हिरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-स्वातंत्र्यानंतरची जी पिढी राजकारणात होती, ती पूर्णपणे समाजासाठी झटत होती. आजची पिढी मात्र व्यवसाय म्हणून राजकारणात उतरत आहे, हे चुकीचे आहे. त्यामुळे आजच्या पिढीला जुन्या पिढीतील राजकारण्यांच्या कार्याची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी परिवहन व राजशिष्टाचारमंत्री प्रशांत हिरे यांनी बुधवारी (15 जानेवारी) केले.

नगर तालुक्याचे माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार दादा कळमकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संग्राम जगताप उपस्थित होते. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर यांना ‘आरोग्यभूषण’, डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे यांना ‘शिक्षणभूषण’, ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांना ‘वृत्तभूषण’, कवि प्रकाश घोडके यांना ‘साहित्यभूषण’, डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे यांना ‘समाजभूषण’, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना विकासभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के म्हणाले, नगरच्या समाजकारण, शिक्षण, आरोग्य सेवांसह कृषी, पाणीप्रश्नासाठी म्हस्के यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी जीवापाड कष्ट करून 1967 ते 1978 या काळात उच्चांकी पाझर तलाव बांधून शेतकर्‍यांना दिलासा दिला. यावेळी संस्थेचे विश्वस्त अँड. रामनाथ वाघ, डॉ. जयंत शिंदे, डॉ. प्रकाश पाटील, विजया पाटील, अँड. सुभाष भोर, डॉ. तपन चक्रवर्ती, डॉ. तुफान चक्रवर्ती उपस्थित होते.

राजकारणाचा वापर समाजकारणासाठीच व्हावा..

हिरे म्हणाले, काकासाहेब म्हस्के यांनी त्यांच्या काळात सर्वसामान्य जनता व शेतकर्‍यांसाठी संघर्षपूर्ण लढा दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तरुणांना राजकारणात आणले पाहिजे, असे सर्वच पक्ष म्हणतात. पण, युवक संघटनेचा नेता मात्र साठीतील निवडतात, हा विरोधाभास आहे. वयाच्या साठीत राजकारण्यांनी निवृत्त झाले पाहिजे. पण, आपल्याकडे नेते साठीतही खुच्र्या अडवून बसतात. राजकारण हे समाजकारणासाठीच केले पाहिजे, ही जाणीव युवकांना करून देणे हे सर्वांपुढील मोठे आव्हान आहे.