नेवासे - नेवासे बुद्रूक येथील महिला शेतकरी विजया मोहनराव हापसे यांच्या शेतातील डाळिंबे परदेशात रवाना होणार आहेत. त्यासाठीचा करार त्यांनी नुकताच व्यापा-यांबरोबर केला. नेवासे परिसरातील डाळिंबे प्रथमच परदेशवारी करत असल्याने हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.
नेवासे बुद्रूक शिवारातील नागफणी फार्म येथे कमी पाण्यात भगवा डाळिंबाची बाग विजया हापसे यांनी उत्तम नियोजन व शास्त्रोक्त पद्धतीने पिकवली आहे. यावरच न थांबता त्यांनी यशस्वीपणे या मालाचे मार्केटिंग केल्यामुळे ही डाळिंबे दिल्ली, जयपूरबरोबरच परदेशात विक्रीसाठी जाणार आहेत.
हापसे यांच्या शेतात यापूर्वी पावसाच्या पाण्यावर ज्वारीचे पीक घेण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी या जमिनीतील दोन एकर क्षेत्रावर भगवा या वाणाच्या डाळिंबांची बाग लावली. त्यासाठी त्यांनी गोरक्ष राहटळ यांचे मार्गदर्शन घेतले. 8 बाय 12 फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली. परिसरात पाण्याची नेहमीच अडचण असल्याने पाण्याचे शेततळे तयार केले. डाळिंब बागेला त्या ठिबक सिंचनचा वापर करून पाणी देतात. तेरा महिन्यांनंतर या डाळिंब बागेत पहिला बहर आला. हा बहर पकडताना त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. यावेळी बागेतील डाळिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली. बागेत नरफुले अधिक येत होती. फळाची गळ समस्याही मोठी डोकेदुखी ठरत होती. परंतु हापसे यांनी अभ्यास करून राहटळ यांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार सेंद्रिय खत व विद्राव्य खतांचा वापर केला. टंचाईवर उपाय म्हणून बाटल्यांमधून पाणी देऊन बाग जगवली. तसेच झाडांखाली ओल टिकून रहावी म्हणून बागेत गवताचे बेड आच्छादनही केले. अथक परिश्रमातून महिला असूनही त्यांनी चांगले उत्पादन घेतले.
विजया यांचे पती मोहनराव हापसे पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु आहेत. त्यांचे त्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असते. डाळिंबाच्या बागेबरोबरच त्यांनी दूध व्यवसायदेखील उत्तमप्रकारे सांभाळला असून रोज 300 लिटरचे संकलन सुरू आहे.
दोन एकरांत साडेतरा लाखांचे उत्पन्न
दोन एकर क्षेत्रांत 800 झाडे आहेत. त्यात यावर्षी सुमारे 18 टन डाळिंबांचे उत्पादन निघाले. दिल्ली व जयपूर बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो 80 रुपये भाव मिळाला. त्यातून त्यांना 13 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता परदेशात निर्यात करणारे व्यापारीही बागेला भेट देत आहेत. यासाठीचा करारही होत असल्याने ही डाळिंबे परदेशवारी करणार आहेत.