आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पोस्टल’ सोसायटी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोस्टल डिव्हिजन को-ऑप क्रेडिट सोसायटी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात सापडली आहे. संस्थेचा कारभार सहकारी संस्थेच्या नियमानुसार सुरू आहे की नाही, याबाबत चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दोन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

संस्थेचे सभासद संतोष यादव यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. संस्थेच्या संचालकांनी सहकार कायदा आणि पोटनियमांचे उल्लंघन करून नामंजूर करण्यात आलेल्या पोटनियमांची स्वअधिकारात अंमलबजावणी केली, तसेच विरोधकांना संचालक मंडळ विश्वास घेत नाही, असे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेत सहकारी संस्थांचे अपर निबंधक (पुणे) यांनी गेल्या आठवड्यात संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांना संस्थेचे कामकाज सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 व मंजूर उपविधीनुसार करा; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर आता हौसारे यांनी नगर तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक एस. व्ही. निकम व मुख्य लिपिक एस. यु. बनसोडे या दोघांची या संस्थेकडून अधिनियम, नियम व उपविधीच्या उपबंधाचे पालन होते की नाही, कारभार सुयोग्य व्यापारी तत्त्वावर सुरू आहे की नाही याच्या चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. महिनाभरात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही हौसारे यांनी दिले आहेत.