आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हयात असतानाच निघाली होती थोर व्यक्तींची टपाल तिकिटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सचिन तेंडुलकरची छबी असलेली पोस्टाची तिकिटे प्रकाशित करताना हयात असताना निघालेले मदर तेरेसा यांच्यानंतरचे हे तिकीट असा उल्लेख करण्यात आला होता. तथापि, महर्षि धोंडो केशव कर्वे, विश्वेश्वरैया, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, व्ही. व्ही. गिरी, राजीव गांधी यांनाही जिवंतपणी तिकिटावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. जामखेड येथील तिकीट संग्राहक पोपटलाल हळपावत यांनी ही बाब निदर्शनास आणली आहे.
14 नोव्हेंबरला सचिन तेंडुलकरची छबी असलेले पोस्टाची वीस रुपये मूल्य असलेली दोन तिकिटे प्रकाशित करण्यात आली. त्यावेळी अनेक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी एखादी महान व्यक्ती जिवंत असताना त्याची छबी असलेले पोस्टाचे तिकीट आपल्या देशात निघत नाही, परंतु याला सन्माननीय अपवाद करून मदत तेरेसा यांचे तिकीट 1980 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसर्‍यांदा असा अपवाद सचिनच्या बाबतीत करण्यात आला, असे नमूद केले होते. हे म्हणणे योग्य नाही, असे सांगून हळपावत यांनी काही दाखले दिले.
थोर स्त्री उद्धारक, शिक्षणतज्ज्ञ महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ते हयात असताना त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट 18 एप्रिल 1958 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. एखाद्याच्या जीवनप्रती प्रकाशित झालेले हे भारतातील पहिले तिकीट. महर्षी तब्बल 104 वर्षे जगले. त्यांचे निधन 1962 मध्ये झाले.
जगप्रसिद्ध अभियंता एम. विश्वेश्वरैया तब्बल 102 वर्षे जगले. त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली, तेव्हा 15 सप्टेंबर 1960 रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले गेले.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सन्मानार्थ 13 मे 1962 रोजी त्यांची छबी असलेले तिकीट प्रकाशित केले गेले. त्यांचे निधन 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाले. दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची छबी असलेले तिकीट 5 सप्टेंबर 1967 रोजी प्रकाशित झाले. पुढे 16 एप्रिल 1975 रोजी त्यांचे निधन झाले.
राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या कार्याचा गौरव म्हणून 14 ऑगस्ट 1967 रोजी त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित केले गेले. त्यांचे निधन 13 जून 1980 रोजी झाले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शताब्दीनिमित्त 28 डिसेंबर 1985 रोजी सेटीनेट प्रकारातील चार तिकिटांचे एकत्रित तिकीट प्रकाशित केले गेले होते. त्या तिकिटावर काँग्रेसच्या 61 राष्ट्रीय अध्यक्षांचे चेहरे छापण्यात आले आहेत. त्यामध्ये तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी होते. त्यामुळे हयातीत तिकिटावर येण्याचा मान त्यांना मिळाला, अशी माहिती हळपावत यांनी दिली.