आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास पैशांच्या पोस्टकार्डाने मिळवून दिली अनोखी भेट..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-पन्नास पैशांच्या साध्या पोस्टकार्डवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव येथील उद्योगपती भवरलाल जैन यांनी र्शीगोंद्यातील एका सेवाभावी संस्थेतील वंचित मुलांसाठी नवाकोरा संगणक संच पाठवला. या संगणकामुळे या मुलांसाठी शिक्षणाचे नवे द्वार खुले झाले आहे.

हा अनुभव सांगताना र्शीगोंदे येथील महामानव बाबा आमटे संस्थेचे संचालक अनंत झेंडे म्हणाले, दिवाळीपूर्वीची गोष्ट. गावातील आबासाहेब मोरे यांच्या कटिंग सलूनमध्ये बसलो असताना टीव्हीवरील जय महाराष्ट्र वाहिनीवर एकत्र कुटुंब पद्धत कशी असते, अशा कुटुंबात दिवाळीचा सण कसा साजरा केला जातो याविषयी तो कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात जळगाव येथील भवरलाल जैन यांचे शेत दाखवण्यात आले. टेबलवर विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. सगळे पाहुणे तेथे आनंदात वावरत होते. हा कार्यक्रम पाहिल्यावर लगेच मी साध्या पोस्टकार्डवर जैन यांना पत्र लिहिले. त्यात संस्थेविषयी माहिती दिली.

नंतर असे काही पत्र लिहिले हे मी विसरूनही गेलो. पण दोन महिन्यांनी मला जळगावहून फोन आला. कोणी मनीष शहा बोलत होते. नेमक्या त्या दिवशी महामानव बाबा आमटे यांच्या नावाने सुरू केलेल्या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफले जाणार असल्याने मी गडबडीत होतो. मी शहा यांना नंतर फोन करतो असे सांगितले. नंतर सवडीने फोन केला, तेव्हा कोणी भेटले नाही. पण जैन यांच्या कंपनीतून तो फोन आला एवढे समजले. 2 जानेवारीला पुन्हा जळगावहून फोन आला. मनीष शहा म्हणाले, ‘‘भवरलाल भाऊ तुमच्या संस्थेला एक संगणक देणार आहेत’’. माझा विश्वासच बसेना. साधे पोस्टकार्ड तर आपण पाठवले होते. आपला परिचय नाही, त्यांनी संस्था पाहिलेली नाही. असे असताना हे कसे घडले, असा प्रश्न पडला. पण भाऊंना माझ्या पत्रातील वेदना जाणवल्या होत्या. ही संस्था खरोखरच वंचितांसाठी काम करते, कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही हे त्यांनी ओळखले असावे. केवळ पोस्टकार्डावरील शब्दांवर विश्वास ठेवून भवरलालभाऊंनी 40 हजार रूपये किमतीचा संगणक संच आणि काही पुस्तके पाठवून दिली.

नुकताच हा संच र्शीगोंद्यात पोहोचला. नवाकोरा संगणक संच पाहताच संस्थेतील मुलांना कोण आनंद झाला. या भेटीबद्दल सर्वांनी भवरलाल जैन यांचे मनापासून आभार मानले.