आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या खड्ड्यांचे नशीब अखेर 'स्थायी'च्या कृपेने फळफळले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुढीलकाळात रस्त्यांवरील खड्डे बुजवताना मुरूम वापरू नका, डांबर टाकूनच खड्डे बुजवा, असे आदेश स्थायी समितीने मनपा प्रशासनाला साेमवारी दिले. यापूर्वी मुरूम टाकूनच खड्डे बुजवण्यात आले, तेव्हा मात्र स्थायी समितीला खड्ड्यांमधील मुरूम दिसला नाही. मागील आठ वर्षांत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला. आता समितीला खड्ड्यांवरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत उपरती झाली असली, तरी यापूर्वी झालेल्या कोट्यवधींच्या उधळपट्टीस जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खड्डा, डागडुजी, पुन्हा खड्डा हे चक्र शहरात अनेक वर्षांपासून सुरू आहे. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांची संख्या मात्र कमी झाली नाही. उलट, दर तीन महिन्यांनी रस्ते डागडुजीच्या नावावर (पॅचिंग) लाखोंंची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. महिनाभरापूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले. मुरूम माती टाण्यात आल्याने हे खड्डे महिनाभरात पुन्हा उघडे पडले. या खड्ड्यांवर झालेल्या खर्चाला कार्याेत्तर मंजुरी देण्याचा विषय सोमवारी स्थायीच्या सभेत ठेवण्यात आला. सभापती गणेश भोसले यांच्यासह समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. लाखो रुपयांचा खर्च होऊनही खड्डे पुन्हा उघडे कसे पडले, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला. यापुढील काळात खड्डे बुजवण्यासाठी मुरूम वापरू नका, खड्डे डांबर टाकूनच बुजवले पाहिजेत, असे आदेश भोसले यांनी प्रशासनाला दिले. उशिरा का होईना, पण स्थायी समितीला झालेली ही उपरती स्वागतार्ह असली, तरी खड्ड्यांवर आतापर्यंत झालेल्या कोट्यवधींच्या उधळपट्टीचे काय, असा सवाल नगरकर उपस्थित करत आहेत. कोट्यवधी खर्च करूनही दिल्लीगेट ते पत्रकार चौक, नेप्तीनाका चौक ते आयुर्वेद कॉलेज, अप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका या रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढतीच आहे. प्रत्येक वेळी दगड-माती, विटांचे तुकडे, मुरूम, तसेच काही वेळा, तर चक्क केरकचरा टाकून खड्डे बुजवण्यात आले. या कामासाठी मागील आठ वर्षांत तब्बल दीड कोटींपेक्षा अधिक खर्च झाला, तरी नगरकरांच्या नशिबी चांगले रस्ते नाहीत. विशेष म्हणजे यासंदर्भात सत्ताधारी विरोधक मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे नगरकरांच्या पैशांची ही उधळपट्टी अशीच सुरू आहे.

खड्ड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांची पाहणी करणार
गणेशोत्सवाच्यापार्श्वभूमिवर मिरवणूक मार्गांवरील खड्डे डांबराऐवजी मुरूम टाकून बुजवण्यात आले. त्यासाठी ४६ लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. या खर्चास कार्याेत्तर मंजुरी देण्यासाठी हा विषय सोमवारी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. समितीने खर्चास मंजुरी दिली, परंतु संबंधित ठेकेदाराला बिले देण्यापूर्वी बुजवलेल्या खड्ड्यांची पाहणी करणार असल्याचे सभापती भोसले यांनी प्रशासनाला सांगितले.

कराच्या बदल्यात खड्डे
नागरिकवृक्षकर, शिक्षणकर, रस्ते, सफाई, जलनि:सारण, पाणीट्टी, घरपट्टी अशा विविध प्रकारच्या १२ करांचा भरणा मनपाकडे करतात. मात्र, त्या बदल्यात त्यांना खड्ड्यांनी भरलेले रस्ते मिळतात. नागरिकांनी अर्ज, निवेदन, तक्रार आंदोलने करूनही रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे तक्रार किती वेळा कोणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

नावापुरतेच सेवक
मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम ४८४ नुसार नगरसेवक, पदाधिकारी अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे, ही जबाबदारी त्यांचीच आहे. सध्या मात्र शहरात उलट परिस्थिती दिसून येत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे.